रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. वलदेई डिस्कशन क्लबमधील वार्षिक परराष्ट्र धोरणविषयक भाषणादरम्यान पुतिन यांनी मोदींचं कौतुक करताना त्यांचा उल्लेख आपले अत्यंत चांगले मित्र असा केला आहे. जवळपास ४ वर्षांहून अधिक काळ रशिया व युक्रेन यांच्यात चालू असेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केल्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी नवी आघाडी उघडली जात असल्याचं बोललं जात आहे.

काय म्हणाले व्लादिमीर पुतिन?

पुतिन यांनी जागतिक वर्तुळातील महत्त्वाचे नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख केला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझे वैयक्तिक मित्रत्वाचे संबंध आहेत. पण असं असूनदेखील ते सातत्याने युक्रेन युद्धाबाबत प्रश्न उपस्थित करत असून युद्धसमाप्तीचा मुद्दा मांडत आहेत. दोन्ही बाजूंना मान्य होतील असा पर्याय शोधून काढण्यासाठी ते प्रयत्नशील असून त्यांच्याकडे यासाठी अतिशय चांगल्या कल्पनादेखील आहेत”, असं पुतिन यावेळी आपल्या भाषणात म्हणाले.

“त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकरणात तटस्थ भूमिका घेतात, पण त्यातही हा संघर्ष संपुष्टात यावा याबाजूने ते विचार करतात. मला वाटतं त्यांच्याबाबत ही बाब थेटपणे सांगणं हे माझं कर्तव्य आहे. पंतप्रधान मोदींनी यासाठी सुचवलेल्या कल्पनांसाठी आम्ही आभारी आहोत. या संघर्षावर शक्य तितक्या लवकर शांततापूर्ण मार्गांनी तोडगा काढण्याच्या मोदींच्या इच्छेसाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत”, असंही पुतिन यांनी आपल्या भाषणात नमूद केलं.

मोदी-पुतिन भेटीत काय घडलं?

३१ ऑगस्ट रोजी SCO परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी व रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट झाली होती. या भेटीदरम्यान गेल्या चार वर्षांहून अधिक काळापासून चालू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाबाबत मोदींनी पुतिन यांच्याकडे चिंता व्यक्त केली होती. तसेच अमर्याद युद्धापासून युद्धबंदीपर्यंत रशियाने पाऊल उचलावं, असं आवाहन त्यांनी पुतिन यांना केलं होतं.