तब्बल २० वर्षांनंतर अखेर आता अमेरिकेने अफगाणिस्तानमधलं आपलं सैन्य बाहेर काढलं. आता अफगाणिस्तान हा देश तालिबानी दहशतवाद्यांच्या ताब्यात आहे. अमेरिकेने आपलं सैन्य देशातून बाहेर काढल्यानंतर तालिबान्यांनी हवेत गोळीबार करत तसंच फटाके फोडत आपला आनंद व्यक्त केला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेच्या या अफगाणिस्तानातल्या २० वर्षांबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.

ते म्हणाले, “अमेरिकी सैन्य २० वर्षे त्या प्रदेशात उपस्थित होते आणि कोणालाही दुखावल्याशिवाय स्थानिक लोकांना सुसंस्कृत करण्यासाठी ते २० वर्षांपासून ते प्रयत्न करत होते. परंतु खरं तर, समाजावर राजकीय संघटनांसह अमेरिकेचे नियम आणि जीवनमान लादणे याचा एकमेव परिणाम म्हणजे शोकाकुलता आणि नुकसान. त्यामुळे हा परिणाम शून्य आहे. बाहेरून येऊन काहीही लादणे अशक्य आहे”.

हेही वाचा – अमेरिकन लष्कराने अफगाणिस्तान सोडलं, २० वर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम; बायडेन म्हणाले, “मागील १७ दिवसांमध्ये…”

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले, “अफगाणिस्तानमधली अमेरिकेची २० वर्षांची मोहीम शोकांतिकांमध्ये संपली आणि त्यांनी काहीही साध्य केले नाही”. ते म्हणाले की, अफगाणिस्तानमध्ये त्यांचे नियम लागू करण्याचा अमेरिकी सैन्याचा प्रयत्न व्यर्थ आहे. बुधवारी रशियन सुदूर पूर्वेकडील व्लादिवोस्तोक शहरामध्ये किशोरवयीन मुलांसोबत शालेय वर्ष सुरू झाल्याच्या निमित्ताने ते बोलत होते.

ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….

पुतिन यांनी पाश्चिमात्य देशांवर त्यांची मूल्ये नॉन-वेस्टर्न राष्ट्रांवर लादण्याचा प्रयत्न केल्याची टीका अमेरिकेवर केली आहे.
अमेरिकी सैन्य आता अफगाणिस्तानमधून पूर्णपणे माघारी परतलं आहे. याचबरोबर मागील २० वर्षांपासून येथे सुरु असणारा अमेरिकेचा संघर्ष संपल्याची घोषणाही करण्यात आली. एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकन कमांडर आणि अमेरिकन राजदूत हे अफगाणिस्तान सोडणारे शेवटचे अमेरिकन नागरिक ठरले.