Vladimir Putin Warning Iran Israel War COVID Comparison: आखाती प्रदेशात सुरू असलेल्या युद्धावर संसदेत निवेदन करत असताना पंतप्रधान मोदी यांनी करोना महामारीतील संकटाचा हवाला दिला होता. भारताने करोना काळात जशी एकजूट दाखवून मोठ्या संकटाचा सामना केला, तशीच एकजूट आताही दाखविणे गरजेचे असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले होते. त्यानंतर आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही अशाच प्रकारचे विधान केले आहे. “आखाती प्रदेशात सुरू असलेल्या युद्धाचे जगावर काय परिणाम होतील, हे कुणीही सांगू शकत नाही. जे या युद्धात स्वतः सहभागी आहेत, त्यांनाही याची कल्पना नाही”, असे सांगून पुतिन यांनी या युद्धाची तुलना करोना महामारीच्या परिस्थितीशी केली.

रशियातील उद्योगपतींच्या परिषदेत बोलत असताना पुतिन म्हणाले की, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर भडकलेल्या युद्धामुळे अनेक उद्योग अडचणीत आले आहेत. या युद्धाचे आगामी काळात कोणते गंभीर परिणाम होतील, हे आताच सांगणे अवघड आहे.

पुतिन पुढे म्हणाले, “पश्चिम आशियातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी, उत्पादन आणि आयात-निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. हायड्रोकार्बन, धातू आणि खते यांच्याशी संबंधित उद्योगांना थेट फटका बसला असून त्याचे मोठे आर्थिक परिणाम भोगावे लागण्याची शक्यता आहे.” हे सांगून पुतिन यांनी या संकटाची तुलना करोना महामारीशी केली. तसेच करोना काळात ज्याप्रकारे सर्व क्षेत्राची प्रगती मंदावली होती, तशी शक्यता सध्या दिसत असल्याचे ते म्हणाले.

२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला करून युद्धाची सुरुवात केली. आता हे युद्ध संपूर्ण आखाती प्रदेशात पसरले आहे. यामुळे जिथून कच्च्या तेलाची वाहतूक होते, तो मार्ग धोक्यात आला असून जगावर मोठे ऊर्जा संकट ओढवले आहे.

रशिया आव्हानांसाठी तयार

मध्य पूर्वेतील युद्धाचे काय परिणाम होणार, याबाबत अद्याप या युद्धात सामील असलेल्या देशांनाही पूर्णपणे कल्पना नाही. जगावर कोणते गंभीर परिणाम होतील, याचा अंदाज त्यांनाही नाही. उद्योगपतींना संबोधित करत असताना पुतिन पुढे म्हणाले की, रशियाने या नव्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असले पाहिजे. यानिमित्ताने त्यांनी राष्ट्रीय एकतेचे आवाहन केले.