नागपूर : चित्रपटाची तिकीट काढल्यानंतर प्रेक्षकाने ठरलेल्या वेळेत चित्रपट सुरू होण्याची अपेक्षा करणे स्वाभाविक आहे. मात्र, चित्रपटाची वेळ रात्री १०.३५ वाजताची असताना तब्बल २२ मिनिटे जाहिराती आणि चित्रपटांचे ट्रेलर दाखवून त्यानंतर चित्रपट सुरू करणे पीव्हीआर सिनेमाज आणि पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेडला चांगलेच महागात पडले आहे. हैदराबाद जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने ही बाब सेवेत त्रुटी आणि अनुचित व्यापार पद्धत असल्याचे नमूद करत संबंधित कंपन्यांना तक्रारदाराला २० हजार रुपये नुकसानभरपाई आणि पाच हजार रुपये खटल्याचा खर्च देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ५० हजार रुपये दंडात्मक नुकसानभरपाई ग्राहक कल्याण निधीत जमा करण्याचे निर्देश दिले.
१०.३५ ची वेळ, चित्रपट मात्र १०.५२ वाजता सुरू
हैदराबादमधील अधिवक्ता चंदा अथिश कुमार यांनी २० जून २०२५ रोजी ‘कुबेरा’ चित्रपटाची दोन तिकिटे पीव्हीआर सिनेमाजकडून ५०० रुपयांना खरेदी केली होती. चित्रपटाचा खेळ रात्री १०.३५ वाजता सुरू होणार होता. ते आणि त्यांचा मित्र सुमारे १०.३० वाजता चित्रपटगृहात पोहोचून आपल्या जागेवर बसले. सुरुवातीला दाखविल्या जाणाऱ्या जाहिराती आणि ट्रेलर १०.३५ वाजेपर्यंत संपतील, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, जाहिराती आणि ट्रेलर सुरूच राहिले आणि प्रत्यक्ष चित्रपट रात्री १०.५२ वाजता सुरू झाला. त्यामुळे चित्रपट सुरू होण्यास सुमारे २२ मिनिटांचा विलंब झाला.
केंद्राच्या नियमांचा दाखला
या विलंबामुळे आपली गैरसोय झाल्याचा दावा करत कुमार यांनी ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ मधील कलम ३५ अंतर्गत ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ३० नोव्हेंबर २०२३ रोजी जारी केलेल्या कार्यालयीन ज्ञापनातील तरतुदींचाही त्यांनी आधार घेतला. मंजूर जनजागृती किंवा सार्वजनिक सेवा संदेशांच्या चित्रफिती दोन मिनिटांपर्यंत दाखवता येतात आणि त्यासाठी निर्धारित कालावधीचे पालन करणे आवश्यक असल्याचे या ज्ञापनात नमूद आहे, असा त्यांचा युक्तिवाद होता.
‘जाहिराती दाखवणे हा व्यवसायाचा अधिकार’
पीव्हीआर सिनेमाज आणि पीव्हीआर इनॉक्स लिमिटेडने तक्रारीला विरोध केला. जाहिराती, सार्वजनिक सेवा संदेश आणि चित्रपटांचे ट्रेलर दाखवणे हा व्यवसायाचा भाग असून, भारतीय संविधानातील अनुच्छेद १९(१)(ग) नुसार व्यवसाय करण्याचा त्यांना अधिकार असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच जाहिराती किंवा सार्वजनिक सेवा संदेश दाखवण्यास कोणत्याही कायद्याने पूर्णपणे मनाई केलेली नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यासाठी लागणारा वेळ हा सेवेत त्रुटी मानता येणार नाही, असा त्यांचा युक्तिवाद होता.
पीव्हीआरवर ऐकून ७५ हजारांची आर्थिक कारवाई
मात्र, आयोगाचे अध्यक्ष वक्कंती नरसिंह राव आणि सदस्य सुम वला यांच्या खंडपीठाने पीव्हीआरचा युक्तिवाद मान्य केला नाही. चित्रपट रात्री १०.३५ वाजता सुरू होणे अपेक्षित असताना १०.५२ वाजेपर्यंत जाहिराती व ट्रेलर सुरू होते, ही बाब नाकारण्यासाठी संबंधित कंपन्यांनी ठोस कागदपत्रे सादर केली नसल्याचे आयोगाने नमूद केले. मंत्रालयाच्या ३० नोव्हेंबर २०२३च्या कार्यालयीन ज्ञापनातील तरतुदींचा विचार करता निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ व्यावसायिक जाहिराती दाखवणे ही सेवेत त्रुटी आणि अनुचित व्यापार पद्धत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.
त्यामुळे आयोगाने पीव्हीआर सिनेमाज आणि पीव्हीआर इनॉक्स लिमिटेड यांना संयुक्तपणे व स्वतंत्रपणे तक्रारदाराला २० हजार रुपये नुकसानभरपाई आणि पाच हजार रुपये खटल्याचा खर्च देण्याचे आदेश दिले. भविष्यात अशी अनुचित व्यापार पद्धत न करण्याचे निर्देशही देण्यात आले. याशिवाय ५० हजार रुपये दंडात्मक नुकसानभरपाई ग्राहक कल्याण निधीत जमा करण्याचे आदेश दिले. आदेशाची अंमलबजावणी ४५ दिवसांत न झाल्यास थकबाकीच्या रकमेवर प्रतिवर्षी ९ टक्के व्याज लागू होईल.
