सूफी संगीत क्षेत्रात आपल्या अनोख्या गायनशैलीने कानसेनांच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या वडाली ब्रदर्स या जोडीतील उत्साद प्यारेलाल वडाली यांचे निधन झाले आहे. उस्ताद पूरणचंद वडाली यांचे धाकटे बंधू प्यारेलाल वडाली यांनी शुक्रवारी सकाळी वयाच्या ७५ व्या वर्षी अमृतसर येथे अखेरचा श्वास घेतला. कार्डीअॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झालाचे वृत्त ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे.

गुरुवारी त्यांना अमृतसर येथील फोर्टीज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात एक पोकळीच निर्माण झाली आहे.

पंजाबी सूफी संगीतामध्ये त्यांचे अतिशय मोलाचे योगदान असून, तरुणाईच्या प्लेलिस्टमध्येही त्यांच्या गाण्यांचा समावेश आहे. काही वर्षांपूर्वी ‘एमटीव्ही कोक स्टुडिओ’मध्ये त्यांनी सादर केलेल्या ‘तू माने या ना…’ या गाण्याने बरीच लोकप्रियता मिळवली होती.

संगीत क्षेत्रात अदबीने पाहिल्या जाणाऱ्या वडाली ब्रदर्स यांनी जालंधर येथील हरबल्लाह मंदिरातून आपल्या गायनाची सुरुवात केली होती. त्यांच्या गायनशैलीत एक वेगळ्याच प्रकारचा साज असून, हीच वेगळी शैली त्यांना या क्षेत्रात लोकप्रियतेच्या शिखरावर नेण्यात महत्त्वाची ठरली होती. वडाली ब्रदर्स प्रामुख्याने काफियाँ, गझल आणि भजन या प्रकारच्या गायनासाठी ओळखले जातात.

हिंदी चित्रपटसृष्टीतही वडाली ब्रदर्सच्या गाण्यांनी नेहमीच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. ‘ए रंगरेज…’ (तनू वेड्स मनू’, ‘इक तू ही तू ही’ (मौसम) या गाण्यांच्या माध्यमातून त्यांनी संत कवीची परंपरा एका वेगळ्या माध्यमातून पुढे नेण्याचे शिवधनुष्य पेलले. या सुरेल जोडीने प्रामुख्याने बुल्ले शाह, कबीर, अमीर खुसरो आणि सूरदास यांसारख्या संतकवींच्या रचना सादर करण्याला प्राधान्य दिले होते.