Qatar Gas Terminal Blast Ras Laffan Indian Workers Killed: कतारमधील एका प्रमुख गॅस टर्मिनलवर रविवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण स्फोटात १३ कामगारांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे. इराणने केलेल्या हल्ल्यानंतर हे टर्मिनल पुन्हा सुरू करण्याचे काम सुरू असतानाच ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेमुळे जागतिक ऊर्जा बाजारात मोठी खळबळ उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कतारच्या ‘रास लाफान’ औद्योगिक क्षेत्रातील ‘बरझान’ स्थानिक गॅस पुरवठा प्रकल्पात हा स्फोट झाला. कतार हा जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक वायू उत्पादक देशांपैकी एक असल्याने या घटनेचे जागतिक स्तरावर तीव्र पडसाद उमटण्याची भीती आहे.
१८ जण अजूनही बेपत्ता, ६६ जखमी
कतारच्या गृह मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या भीषण स्फोटानंतर किमान १८ जण अजूनही बेपत्ता असून ६६ जण जखमी झाले आहेत. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घातपाताचा संशय नाही: कतारचे ऊर्जामंत्री
कतारचे ऊर्जामंत्री साद शेरिदा अल-काबी यांनी दोहा येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली की, मृतांचा आकडा १३ वर पोहोचला आहे. हा स्फोट एक औद्योगिक अपघात (Industrial Accident) असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, हा कोणताही घातपात किंवा शत्रूने केलेला हल्ला नसल्याचे ‘दोहा न्यूज’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
“हा केवळ एक दुर्दैवी औद्योगिक अपघात आहे. यामागे घातपात किंवा कोणत्याही बाहेरील हल्ल्याचे पुरावे मिळालेले नाहीत.” – साद शेरिदा अल-काबी, ऊर्जामंत्री, कतार
युद्धाची पार्श्वभूमी आणि होर्मुझची सामुद्रधुनी
अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान, मार्च महिन्यात इराणच्या एका क्षेपणास्त्राने ‘रास लाफान’वर हल्ला केला होता. या हल्ल्यात गॅस टर्मिनलचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर कतारने आपले गॅस उत्पादन तात्पुरते बंद केले होते.
इराणने आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ हा मार्ग बंद केल्यामुळे कतारला आपल्या ग्राहकांपर्यंत गॅस पोहोचवणे अशक्य झाले होते. त्यामुळे बंद पडलेले हे प्रकल्प रविवारी रात्री पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जात असतानाच हा दुर्दैवी स्फोट झाला.
