‘क्वाड’ देशांमुळे हिंद प्रशांत क्षेत्रात खुल्या व मुक्त व्यवस्थेस उत्तेजन

बायडेन प्रशासनाचे मत

(संग्रहित छायाचित्र)

 

 

क्वाड देशांच्या माध्यमातून अमेरिकेने हिंद प्रशांत क्षेत्रात खुली व मुक्त व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न केला असल्याचे बायडेन प्रशासनाने म्हटले आहे. क्वाड देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, अमेरिका, भारत व जपान या देशांचा समावेश आहे. हा गट हिंद प्रशांत क्षेत्रात चिनी लष्कराची एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे.

अमेरिकी परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी सांगितले की, क्वाड हे अमेरिकेने हिंद प्रशांत क्षेत्रात खुली व मुक्त व्यवस्था तयार करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे मोठे फलित आहे. चीनने या भागात लष्करी कारवाया वाढवल्या असून त्या परिस्थितीत ही जागतिक पातळीवरची आघाडी चीनला काबूत ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहील.

दक्षिण व पूर्व चीन सागरात चीनने बऱ्याच भागांत प्रादेशिक वाद निर्माण केले असून कृत्रिम बेटे तयार करून त्यांचे लष्करीकरण केले आहे. चीनने दक्षिण चीन सागरावर दावा केला असला तरी तो व्हिएतनाम, मलेशिया, फिलिपाइन्स, ब्रुनेई व तैवान यांनी अमान्य केला आहे. चीनचा जपानशीही प्रादेशिक वाद असून दक्षिण चीन  सागर व पूर्व चीन सागर हे दोन्ही खनिज संपत्ती व नैसर्गिक संपत्तीने परिपूर्ण आहेत. त्यामुळे जागतिक व्यापारात या भागांचे महत्त्वाचे स्थान आहे.

पारंपरिक मुद्दय़ांवर सहकार्य!

प्राइस यांनी सांगितले की, क्वाड देशांच्या संघटनेने पुरेसा वेग घेतलेला असून या देशांमध्ये पारंपरिक मुद्दय़ांवर सहकार्य आहे. सागरी सुरक्षेतही ते एकमेकांना मदत करीत आहेत. कोविड १९ साथ, हवामान बदल यातही ते सहकार्य करीत आहेत. क्वाड देशांची शिखर बैठक घेण्यात येणार असल्याच्या मुद्दय़ावर त्यांनी सांगितले की, अजून तरी बायडेन प्रशासनाने असा काही निर्णय घेतलेला नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Quad countries promote open and free system in the indo pacific region biden abn