R Sreelekha BJP Resignation News: तिरुवनंतपुरम महानगरपालिकेतील नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर आठवड्याभरातच केरळच्या माजी पोलीस महासंचालक आणि भाजपा नेत्या आर. श्रीलेखा यांनी आपल्या भूमिकेवरून माघार घेतली आहे. आपण भाजपा पक्षाला सोडचिठ्ठी दिली नसून एक ‘स्वाभिमानी नगरसेवक’ म्हणून पालिकेत कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. श्रीलेखा यांच्या या निर्णयामुळे तिरुवनंतपुरम महापालिकेत काठावर बहुमत असलेल्या भाजपावरील सत्ता गमावण्याचे संकट टळले आहे.

‘मी मोदी भक्त…’

गेल्या आठवड्यात श्रीलेखा यांनी महापौर व्ही. व्ही. राजेश यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता. त्यानंतर सुरू असलेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम देत रविवारी त्यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, “मी मोदी भक्त आहे, मी पक्ष सोडलेला नाही. मी एक स्वाभिमानी नगरसेवक म्हणून काम सुरूच ठेवीन. मी इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही.”

राजीनाम्यानंतरच्या घडामोडींवर भाष्य करताना त्या म्हणाल्या, “गेल्या आठवड्यात मी रुग्णालयात दाखल असताना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझी भेट घेऊन समजूत काढली आणि पक्ष न सोडण्याची विनंती केली. तसेच, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचे मला कोणतीही अपेक्षा किंवा स्वप्न नव्हते.”

भाजपाचे सत्तासंकट टळले

१०१ सदस्यसंख्या असलेल्या तिरुवनंतपुरम महापालिकेत भाजपा एका अपक्षाच्या पाठिंब्यासह ५१ नगरसेवकांच्या बळावर सत्तेत आहे. श्रीलेखा यांनी राजीनाम्यावर ठाम राहून पद सोडले असते, तर सत्ताधारी भाजपाचे संख्याबळ थेट ४९ वर घसरले असते. त्यामुळे त्यांच्या या यु-टर्नमुळे भाजपाला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भाजपाने माकपची ४५ वर्षांची प्रदीर्घ सत्ता संपुष्टात आणत या पालिकेवर ऐतिहासिक विजय मिळवला होता. केरळमधील आगामी राजकीय प्रवासाचा हा पाया मानला जात असल्याने या महापालिकेतील सत्ता भाजपासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते.

महापौरपदावरून होती नाराजी?

केरळच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी असलेल्या श्रीलेखा यांनी दोन वर्षांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, जानेवारी महिन्यात महापौरपदाच्या शर्यतीत पक्षाने व्ही. व्ही. राजेश यांना पसंती दिल्याने त्या नाराज असल्याच्या चर्चा होत्या.

निवडणुकीनंतर त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, महापौरपदाचे आश्वासन मिळाल्यानंतरच त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. पक्षाने प्रचारादरम्यान त्यांनाच महापौरपदाचा चेहरा म्हणून लोकांसमोर आणले होते, परंतु अखेरच्या क्षणी समीकरणे बदलली. तरीही पक्षाचा निर्णय मान्य करत पाच वर्षे नगरसेवक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी त्यावेळी नमूद केले होते. दरम्यान, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत श्रीलेखा यांनी वट्टीयूरकावू मतदारसंघातून निवडणूक लढवली होती; मात्र त्या काँग्रेस आणि माकपनंतर तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या होत्या.

कोण आहेत आर. श्रीलेखा?

१९८७ च्या बॅचच्या केरळ केडरमधल्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी म्हणून त्या ओळखल्या जातात. पोलीस महासंचालक पद मिळवणाऱ्याही त्या पहिल्याच महिला आहेत. प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी त्या प्राध्यापक म्हणून तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत होत्या. १९८६ मध्ये त्या राष्ट्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झाल्या.