राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) नेत्या आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी शनिवारी शासकीय निवासस्थान रिकामा करण्यास नकार दिला. “पाटण्यातील १० सर्क्युलर रोड येथील आपले शासकीय निवासस्थान रिकामा करणार नाही”, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. बिहार सरकारने त्यांना बंगला रिकामा करण्याचे निर्देश देणारी नोटीस बजावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी हे विधान केले.
राबडीदेवींचा निवास्थान रिकामं करण्यास नकार
प्रसारमाध्यमांशी बोलताना राबडी देवी म्हणाल्या की, “घर रिकामे करण्यासाठी ते पोलिसांना बोलावू शकतात, पण मी हे निवासस्थान सोडणार नाही.” बिहार सरकारने शुक्रवारी राबडी देवी यांना १० सर्क्युलर रोड येथील सरकारी बंगला रिकामा करण्यास सांगणारी नोटीस बजावली होती. हे निवासस्थान आता पशुधन आणि मत्स्य संसाधन मंत्री नंद किशोर राम यांना देण्यात आले आहे.
सरकारी नोटीसनंतरही नकार
एका सरकारी सूचनेनुसार, बिहार विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्या या नात्याने राबडी देवी यांना पर्यायी सरकारी निवासस्थान आधीच देण्यात आले आहे. मात्र, त्यांनी १० सर्क्युलर रोड येथील निवासस्थान अद्याप रिकामे केलेले नाही.
दुसरे घर देण्यात आल्याची माहिती
नोटीसमध्ये असे नमूद केले आहे की, नोव्हेंबर २०२५ मध्ये, एका विभागीय आदेशानुसार, विरोधी पक्षनेत्या म्हणून राबडी देवी यांना हार्डिंग रोडवरील घर क्रमांक ३९ (दुसरा मजला) देण्यात आला. १० सर्क्युलर रोड येथील बंगला नंतर मंत्री नंद किशोर राम यांना देऊ करण्यात आला आहे.
आरजेडीचा जवळचा संबंध
दरम्यान, १० सर्क्युलर रोडचा आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाशी जवळचा संबंध आहे. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राबडी देवींनी याच निवासस्थानातून राज्यकारभार केला होता आणि हा बंगला राष्ट्रीय जनता दलाच्या राजकारणाचे एक प्रमुख केंद्र मानला जातो.
