पीटीआय, वॉशिंग्टन : अमेरिकेतील टेक्सास राज्यातील डॅलस येथे एका मेक्सिकन वंशाच्या अमेरिकन महिलेने भारतीय वंशाच्या चार अमेरिकन महिलांवर वांशिक शेरेबाजी करत त्यांना मारहाण केली. या महिलेने भारतीय महिलांवर वांशिक शेरेबाजी करताना ‘भारतीय अमेरिकेस उद्ध्वस्त करत आहेत, त्यांनी भारतात परत गेले पाहिजे’ असे उद्गार काढले. या महिलेस अटक करण्यात आली आहे.

ही घटना बुधवारी डॅलस येथील एका वाहनतळ भागात घडली. या घटनेच्या चित्रफितीत असे दिसत आहे, की एस्मेराल्डा अप्टन नामक महिला स्वत: मेक्सिकन वंशाची अमेरिकन नागरिक असल्याचे सांगत भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक महिलांवर हल्ला करताना दिसत आहे. ‘तुम्ही भारतीय मला आवडत नाहीत. चांगल्या जीवनमानासाठी भारतीय अमेरिकेत येतात. तुम्ही अमेरिकेस बरबाद करत आहात. तुम्ही भारतात परत जा,’ असे म्हणताना ही महिला दिसत आहे. त्याचबरोबर किमान दोन भारतीय अमेरिकन महिलांना या महिलेने मारहाण केल्याचे दिसत आहे. ही चित्रफीत प्रसृत झाल्यानंतर अमेरिकेतील भारतीय वंशांच्या नागरिक समुदायास मोठा धक्का बसला आहे. ही चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसृत करणाऱ्या व्यक्तीने सांगितले, की ही घटना माझ्या आईसह तिच्या तीन मैत्रिणींसोबत घडली आहे.

यावेळी ही हल्लेखोर महिला असेही म्हणताना दिसत आहे, की मी जिथेही जाते तुम्ही भारतीयच दिसता. भारतात चांगले जीवनमान जर असेल, तर तुम्ही इथे काय करत आहात? त्यानंतर अपशब्द उच्चारून ती किंचाळून मारहाण करताना दिसत आहे. प्लानो पोलिसांनी गुरुवारी दुपारी या महिलेला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा राजकीय, सामाजिक क्षेत्रांत निषेध होत आहे.