Australia Indian Truck Drivers Viral Audio: भारतीय नागरिक नोकरीच्या निमित्ताने विविध देशात स्थलांतरित झालेले आहेत. मात्र सध्या अनेक भारतीयांनी विदेशी भूमीत वंशभेदाचा सामना करावा लागत आहे. याचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. खासकरून पाश्चिमात्य देशांमध्ये भारतीयांवर अन्याय होत असून त्यांना उघड उघड मायदेशी परतण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. सध्या ऑस्ट्रेलियातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ऑस्ट्रेलियन ट्रक चालकाने भारतीयांविरुद्ध हिंसाचाराचे आवाहन करणारी एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. यामुळे ऑस्ट्रेलियातील भारतीय ट्रक चालकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
न्यूज १८ ने या संदर्भातील वृत्त दिले आहे. स्वतःला सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते, कलाकार आणि इतिहास व वसाहतवादाचे भाष्यकार म्हणवून घेणाऱ्या इन्स्टाग्राम क्रिएटर अगी यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये स्थलांतरित ट्रक चालकांना लक्ष्य करणाऱ्या वांशिक अत्याचारांबाबत ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने (एबीसी) या वर्षाच्या सुरुवातीला केलेल्या तपासणीचा अहवाल आणि त्यातील काही उतारे उद्धृत केले आहेत.
या व्हिडीओमध्ये रस्ते वाहतुकीसंदर्भात सुरक्षेचे उपाय सांगण्याऐवजी भारतीय ट्रक चालकांविरोधात गरळ ओकण्यात आली आहे. “भारतीयांना मारून टाका. गोऱ्यांच्या बाजूने उभे राहा. गृहयुद्ध जवळ येत आहे. आम्ही सर्व भारतीय पुरुषांना ठार करणार आहोत. त्यांच्या मुलांना बुडवणार आहोत आणि त्यानंतर त्यांच्या महिलांना गुलाम म्हणून विकणार आहोत”, अशी धमकी या व्हिडीओच्या रेकॉर्डिंगमध्ये ऐकू येते.
एबीसी संस्थेने अनेक भारतीय ट्रक चालकांची मते जाणून घेतली. ट्रक चालकांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियात आता रोजच वर्णद्वेषाचा सामना करावा लागत असून हा रोजच्या जीवनाचा भाग बनला आहे. जर बोलण्याचा लहेजा ऑस्ट्रेलियन असेल तर ते स्वीकार करतात. जर पंजाबी किंवा भारतीय हेल लावून बोलल्यास अपमानाला सामोरे जावे लागते, असे एका ट्रकचालकाने सांगितले.
आणखी एका चालकाने सांगितले की, त्याने आता रेडिओवर प्रतिसाद देणे थांबवले आहे. कारण पलीकडून फक्त शिवीगाळच ऐकू येते. मी खूप वेळा प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला, पण मला खूप असभ्य भाषेत छळण्यात आले. त्यानंतर मी प्रतिसाद देणे बंद केले.
भारतीय वंशाच्या एका ऑस्ट्रेलिन नागरिकाने सांगितले की, दक्षिण ऑस्ट्रेलियातील एका शहरात पेट्रोल पंपावर इंधन भरत असताना तो आपल्या पत्नीशी पंजाबीमध्ये बोलत होता. तेव्हा तिथे उभ्या असलेल्या ऑस्ट्रेलियन व्यक्तीने त्याला हटकले. ही ऑस्ट्रेलिया आहे, इथे इंग्रजीत बोला, असे त्याने सुनावले. त्यानंतर तो आमच्या अंगावर थुंकला.
ट्रकमधील रेडिओ काय असतो?
ऑस्ट्रेलियातील बहुसंख्य अवजड वाहनात अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी रेडिओ बसविलेले असतात. ट्रकचे अपघात, बंद असलेले रस्ते, पोलीस तपासणी, वाहतूक कोंडी आणि इतर धोक्यांबद्दल एकमेकांना सावध करण्यासाठी याचा वापर केला जातो. भारतीय वंशाच्या ट्रक चालकांनी सांगितले की, सध्या हे रेडिओ वर्णद्वेषी शिवीगाळ करण्याचे साधन बनले आहे.
या रेडिओवर बोलणाऱ्या व्यक्तीची ओळख उघड करणे काहीसे जिकरीचे असते. त्याचबरोबर रेडिओची फ्रिक्वेन्सी मर्यादीत असल्यामुळे ट्रक चालकांना ओळखणे अवघड जाते. यामुळे रस्त्यावरील सुरक्षेच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी रेडिओवर अवलंबून असूनही अनेक भारतीय ट्रक चालक आता रेडिओ बंद ठेवत आहेत.
ट्रक चालकांची अपुरी संख्या
ऑस्ट्रेलियाचे माल वाहतूक क्षेत्र सध्या अडचणींचा सामना करत असून त्यांना ट्रक चालकांची उणीव भासत आहे. एबीसीच्या तपासणीत आढळले की, मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियात २८ हजार ट्रक चालकांची कमतरता होती.
ऑस्ट्रेलियातील अनेक चालक वयामुळे निवृत्ती घेत आहेत. तसेच ऑस्ट्रेलियन तरूण या व्यवसायात येण्यास इच्छुक नसल्याने ही पोकळी भरून काढण्यासाठी स्थलांतरितांनी पुढाकार घेतला आहे. अनेक भारतीय अभियंते, आयटी प्रोफेशनल आणि पदवीधर ट्रक चालकाचे काम करत आहेत.
