scorecardresearch

राफेल प्रकरण : “भारतीय मध्यस्थाला देण्यात आलं होतं कोट्यावधीचं गिफ्ट”

फ्रान्समधील मीडियाच्या दाव्यानंतर काँग्रेसचा मोदी सरकारवर निशाणा

राफेल प्रकरण : “भारतीय मध्यस्थाला देण्यात आलं होतं कोट्यावधीचं गिफ्ट”
संग्रहीत

राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याच्या काँग्रेसने पुन्हा एकदा आरोप केला आहे. हा मुद्या पुन्हा एकदा समोर आला असून, राफेल व्यवहारात भारतीय मध्यस्थाला डॅसॉल्टने ५ लाख युरो गिफ्ट म्हणून दिल्याचं वृत्त फ्रान्समधील मीडियानं दिलं आहे. यावरून काँग्रेसने आता मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०१८ मध्ये याबाबत केलेले सगळे ट्विट्स खरे होते असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे. तसेच, पंतप्रधान मोदींनी याप्रकरणी चौकशी जाहीर केली पाहिजे, अशी देखील मागणी काँग्रेसकडून करण्यात आलेली आहे.

“फ्रान्सच्या पब्लिकेशन मीडियापार्टने दावा केला आहे की, २०१६ मध्ये जेव्हा भारत-फ्रान्स यांच्यात राफेल लढाऊ विमानाबाबत करार झाला, त्यानंतर डॅसॉल्टने भारतात एका मध्यस्थाला ही रक्कम दिली. या गोष्टीचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा फ्रान्सच्या अॅण्टी करप्शन एजन्सीने डॅसॉल्टच्या खात्यांचं ऑडीट केलं. असं काँग्रेसने ट्विटद्वारे म्हटलं आहे.

तसेच, “राहुल गांधींनी २०१८ मध्ये जी भूमिका मांडली, की राफेलमध्ये फार मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार झाला. त्यावेळेस देशात ही गोष्ट तितक्या पद्धतीने बाहेर येऊ शकली नाही. परंतु आता आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पष्ट झालेलं आहे की, २०१८ मध्ये नोव्हेंबर महिन्यात जे राहुल गांधींचे ट्विट्स होते ते सगळे सत्य असल्याचं आज आंतरराष्ट्रीय मीडियाने स्पष्ट केलं आहे. फ्रान्समध्ये यावरून खळबळ उडालेली आहे. २८४ कोटींपेक्षा जास्त दलाली घेतल्याचं या निमित्त समोर आलेलं आहे आणि सत्य हे सत्य आहे. राफेलमध्ये रेसकोर्स रोडपर्यंत हा मार्ग गेलेला होता भ्रष्टाचाराचा हे आता पुन्हा एकदा या निमित्त स्पष्ट झालेलं आहे. आतातरी दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी पंतप्रधानांनी चौकशी जाहीर केली पाहिजे.” असं काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-04-2021 at 14:40 IST
ताज्या बातम्या