येथील नवोदय विद्यालयात वरिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांनी रॅगिंग केल्याने किमान ५० विद्यार्थी संरक्षक भिंतीवरून उडय़ा मारून पळाले, अशी माहिती जिल्हा दंडाधिकारी प्रणवकुमार यांनी दिली. अकरावीच्या विद्यार्थ्यांनी रॅिगग केले होते व अधिकारी विद्यार्थ्यांच्या तक्रारीकडे लक्ष देत नव्हते त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी जेवणानंतर आवाराच्या भिंतीवरून उडय़ा मारून रात्री पलायन केले.
सकाळच्या प्रार्थना सभेच्यावेळी आठवीची मुले दिसली नाहीत त्यावेळी हा सगळा प्रकार उघडकीला आला. शाळेच्या प्राचार्यानी त्याबाबत चौकशी केली असता मुले पळून गेल्याचे स्पष्ट झाले.
पळालेले विद्यार्थी थेट सकाळी जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या घरी गेले, त्यानंतर दंडाधिकाऱ्यांनी शाळेचे प्राचार्य के. कन्हैय्या कुमार यांना फोन केला. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी प्राचार्याना विद्यार्थ्यांच्या तक्रारीची चौकशी करण्यास सांगितले व रॅगिंगमध्ये सामील असलेल्या मुलांच्या पालकांना बोलावण्यास सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यात आले. त्यापूर्वी प्राचार्याना अशी तक्रार पुन्हा येता कामा नये अशी तंबी देण्यात आली.
शेखपुरा येथील नवोदय विद्यालयात ५०० विद्यार्थी शिकतात व ते तेथील वसतिगृहात राहतात.