Student Beaten Up in Hostel Room Video: महाविद्यालयांमध्ये वरच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांकडून खालच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांचं रॅगिंग होत असल्याच्या अनेक तक्रारी व प्रकरणं आजपर्यंत समोर आले आहेत. हे प्रकार टाळण्यासाठी २००१ साली म्हणजे २४ वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं रॅगिंगवर बंदी घालण्यासंदर्भातही निर्णय दिला. त्यात आरोपींना ३ वर्षांच्या कारावासाची तरतूदही करण्यात आली. मात्र, अजूनही हे प्रकार थांबत नसल्याचं वारंवार समोर येणाऱ्या घटनांमुळे सिद्ध होत आहे. हिमाचल प्रदेशच्या बाहरा विद्यापीठातील अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका ज्युनिअर विद्यार्थ्याला दारू न प्यायल्यामुळे रात्रभर मारहाण करत रॅगिंग करण्यात आल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.

काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही विद्यार्थी हॉस्टेलच्या एका खोलीमध्ये एका विद्यार्थ्याला मारहाण करताना दिसत आहेत. हा विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांची माफी मागून गयावया करत असल्याचंही त्यांच्या संभाषणावरून लक्षात येत आहे. मात्र, मारहाण करणारे विद्यार्थी त्याला शिवीगाळ करत हाताने, पट्ट्याने मारत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओवर नेटिझन्सच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. बाहरा विद्यापीठानं संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई केली असून त्यासंदर्भातलं पत्रही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हिमाचल प्रदेशमधील रॅगिंगचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत (प्रातिनिधीक छायाचित्र)

नेमकं घडलं काय?

हा व्हिडीओ हिमाचल प्रदेशमधील सोलन जिल्ह्यातल्या बाहरा विद्यापीठाच्या हॉस्टेलमधला असल्याचं समोर आलं आहे. आपण सांगतोय तसं ज्युनिअर विद्यार्थी करत नसल्याचा राग आल्यानं सीनिअर विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकीच एकानं काढला आहे. पीडित विद्यार्थ्याचं नाव रजत असल्याचं मिंटनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आङे. या विद्यार्थ्याला त्याच्या दोन सहकाऱ्यांनी हॉस्टेलच्या एका खोलीत नेलं. तिथे हे सर्व इतर विद्यार्थी बसले होते. त्यांनी रजतला दारू पिण्याचा आग्रह केला. रजतनं त्याला नकार दिल्यानंतर त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.

रजतच्या बाजूला बसलेला विद्यार्थी वारंवार त्याला कानाखाली मारत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. शिवाय, दुसऱ्या एका विद्यार्थ्यानं त्याला पट्ट्यानंही मारहाण केली. हा सगळा प्रकार हॉस्टेलच्या त्या खोलीत रात्रभर चालू होता. त्यांनी रजतला कोंबडा बनून उभं राहण्यासही सांगितलं.

आरोपींवर पोलिसांची कारवाई

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठानं यासंदर्भात चौकशी सुरू केली. यासंदर्भात विद्यापीठातील रॅगिंगविरोधी कमिटीसमोर आरोपींना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. पण त्यांनी हजर राहण्यास नकार दिला. शेवटी १० सप्टेंबर रोजी विद्यापीठानं आरोपींपैकी कार्तिक व सक्षम नावाच्या दोन विद्यार्थ्यांना कायमचं निलंबित केलं. त्याव्यतिरिक्त करण आणि दिव्यांश यांना हॉस्टोलमधून काढून टाकण्यात आलं असून पुढील आदेशांपर्यंत विद्यापीठातून निलंबित करण्यात आलं आहे. पाचवा आरोपी विशालला वर्तन सुधारण्याची ताकीद देऊन सोडून देण्यात लं आहे. यासंदर्भात विद्यापीठाचं पत्रही व्हायरल होत आहे.

पुणे : दिव्यांग मुलीची रॅगिंग; रॅगिंग सहन न झाल्याने ब्रेन स्ट्रोक!

विद्यापीठाच्या कारवाईबरोबरच पोलिसांनीही कारवाई चालू केली आहे. पोलिसांनी चिराग, दिव्यांश व करणला अठक केली असून कार्तिक व सक्षमला ताब्यात घेतलं. सर्व आरोपींना गुरुवारी न्यायालयासमोर सादर केलं जाणार आहे. पीडित विद्यार्थी रजतनं पाचही सीनिअर विद्यार्थ्यांविरोधात कंदाघाट पोलीस स्थानकात तक्रारही दाखल केली आहे.