Raghav Chadha AAP Action: आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांच्यावर पक्षानं केलेल्या कारवाईची गेल्या दोन दिवसांपासून मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. राज्यसभेत वेगवेगळ्या मुद्द्यांवर परखडपणे भूमिका मांडणारे राघव चढ्ढा यांची पक्षानं उपनेतेपदावरून हकालपट्टी केल्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या हकालपट्टीवरून तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असतानाच खुद्द राघव चढ्ढा यांनी त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवर व्हिडीओ संदेश शेअर करत सविस्तर भूमिका मांडली आहे. विशेष म्हणजे या कारवाईला उत्तर म्हणून राघव चढ्ढा यांनी आपल्याच पक्षाला इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष असेल.
राघव चढ्ढांची कारवाईबाबत भूमिका काय?
कारवाईनंतर दुसऱ्याच दिवशी राघव चढ्ढा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ संदेश जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी आपल्यावरील कारवाईसाठी आम आदमी पक्षाला जाब तर विचारलाच आहे, पण त्याचबरोबर पक्षाला सूचक इशारादेखील दिला आहे. त्यामुळे पुढच्या काळात राघव चढ्ढा वेगळी भूमिका घेतात का? याविषयी तर्क लावले जात आहेत.
काय आहे राघव चढ्ढांच्या पोस्टमध्ये?
“मला जेव्हा जेव्हा संसदेत बोलायची संधी मिळते, तेव्हा मी लोकांचे प्रश्न तिथे मांडतो. कदाचित ते असे विषय असतात जे सामान्यपणे संसदेत मांडले जात नाहीत. पण मग लोकांचे प्रश्न मांडणं हा गुन्हा आहे का? मी काही चूक केली का? कारण आम आदमी पक्षानं राज्यसभा सचिवालयाला असं कळवलं आहे की माझ्या संसदेतील बोलण्यावर निर्बंध घालण्यात यावेत. आता माझ्या बोलण्यावर कुणाला बंदी घालावीशी का वाटली?” अशा शब्दांत राघव चढ्ढांनी आम आदमी पक्षाला जाब विचारला आहे.
“मी जेव्हा कधी संसदेत बोललो, तेव्हा मी सामान्य माणसाचे मुद्दे मांडले. विमानतळावरील अन्नपदार्थांच्या प्रचंड किंमती, झोमॅटो-ब्लिंकइटच्या डिलीव्हरी रायडर्सचा मुद्दा, जेवणातील भेसळीचा मुद्दा, टोल प्लाझावरील लूट, बँकेकडून आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त दरांचा मुद्दा, अगदी मध्यमवर्गीयांवरील करांचं ओझं, कंटेंट क्रिएटर्सवरील कारवाया, टेलिकॉम कंपन्या १२ महिन्यांत १३ वेळा आपल्याला रिचार्ज करायला लावतात असे असंख्य मुद्दे मी संसदेत मांडले. यामुळे देशाच्या सामान्य जनतेचा फायदा झाला. पण आम आदमी पक्षाचं काय नुकसान झालं?” असाही सवाल त्यांनी केला आहे.
आम आदमी पक्षाला सूचक इशारा
दरम्यान, या व्हिडीओच्या शेवटी राघव चढ्ढांनी ‘आप’ला सूचक इशारा दिला आहे. “जनतेनं मला खूप प्रेम दिलं. मी जेव्हा जेव्हा जनतेचे प्रश्न मांडतो, तेव्हा तुम्ही मला पाठिंबा देता. मी तुमचे आभार मानतो. मला अशीच साथ देत राहा. मी तुमच्यातलाच एक आहे. ज्या लोकांनी आज माझा संसदेत बोलण्याचा अधिकार काढून घेतला, त्यांना मी काहीतरी सांगू इच्छितो. ‘मेरी खामोशी को मेरी हार ना समझ लेना..मैं वो दरिया हूँ, जो वक्त आने पर सैलाब बनता है”, असं ते म्हणाल आहेत.

राघव चढ्ढांवर नेमकी कोणती कारवाई?
आम आदमी पक्षानं बुधवारी कोणतंही कारण न देता पक्षाचे राज्यसभेतील उपनेते राघव चढ्ढा यांना त्या पदावरून काढणम्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात पक्षानं राज्यसभा सचिवालयाला सविस्तर पत्र लिहून माहिती दिली आहे. तसेच, राघव चढ्ढांना यापुढे पक्षाच्या कोट्यातून राज्यसभेत बोलण्यासाठी वेळ दिला जाऊ नये, असंही पक्षानं सचिवालयाला कळवलं आहे. या अचानक झालेल्या कारवाईमुळे पक्षात सारंकाही आलबेल नसल्याचं चित्र निर्माण झालं असून पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
राघव चढ्ढांच्या जागी अशोक मित्तल
दरम्यान, राघव चढ्ढांचं उपनेतेपद काढून ते पक्षाचे राज्यसभेतील खासदार अशोक मित्तल यांना देण्यात आलं आहे. राघव चढ्ढांना राज्यसभेत बोलण्यासाठी वेळ दिला जाऊ नये, असं पक्षानं सचिवालयाला कळवल्यावरून मोठी टीका होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर चढ्ढांच्या बोलण्याच्या वेळेत कोणतीही कपात करण्यात आलेली नसल्याचं पक्षातील सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं. तसेच, राघव चढ्ढा यांच्यावर सध्या कोणतीही निलंबनाची कारवाई करण्यात येणार नसून ते पक्षाच्या १० राज्यसभा खासदारांपैकी एक म्हणून काम करत राहतील, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
