Raghav Chadha AAP Ex Girlfriend Remark: दिल्लीच्या मतदार यादीत नावाचा समावेश झाल्यावरुन उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवरुन आम आदमी पार्टीमधून भारतीय जनता पार्टीत पक्षांतर केलेल्या खासदार राघव चड्ढा यांनी आपला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आम आदमी पार्टीची अवस्था बॉयफ्रेंडनं सोडलेल्या गर्लफ्रेंडसारखी झालीय, अशी बोचरी टीका चड्ढांनी केली.

राघव चड्ढा यांची आपवर टीका

राघव चड्ढा यांनी चंदिगढ येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “आम आदमी पार्टी एक्स-गर्लफ्रेंडसारखी वागतेय, बॉयफ्रेंड मात्र पुढे निघून गेलाय”, असे चड्ढा यावेळी आपवर टीका करताना म्हणाले. “आप माझीच स्वप्नं पाहतंय, माझचं नाव वारंवार घेतंय. मी आयुष्यात पुढे निघून गेलो तरी ते अजूनही माझच नाव घेत आहेत. माझ्यामुळे त्यांना वेड लागेल अशी स्थिती झाली आहे. मला काळजी वाटते की एके दिवशी, एखाद्या प्रेमभंग झालेल्या प्रियकराप्रमाणे, ते माझ्या आठवणीत स्वतःच्या नसा कापून घेतील,” असे चड्ढा पुढे म्हणाले. निवडणूक आयोगाने राघव चड्ढा यांचे नाव पंजाबमधून कमी करुन दिल्लीच्या मतदार यादीत समाविष्ट केले. यावर चड्ढा यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी आपने केल्यानंतर चड्ढा यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे.

आपची मागणी काय?

चड्ढा यांनी यासाठी निवडणूक आयोगाकडे सादर केलेला अर्ज ६ सार्वजनिक करावा आणि त्यावर हरकती घेण्याची संधी द्यावी, अशी मागणी आपने केली आहे. आपचे राष्ट्रीय माध्यम प्रभारी अनुराग धंडा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, चड्ढा यांनी अर्ज ६ कधी आणि कुठे दाखल केला? याची निवडणूक आयोगाने माहिती द्यावी, अशी मागणी केली. १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये चड्ढा यांच्या नावाचा समावेश नव्हता, असा दावाही धंडा यांनी केली आहे.

३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत केवळ ७४६ क्रमांकापर्यंतच नोंदी असताना, चड्ढा यांचे नाव ७४६ च्या पुढे म्हणजेच ७४७ व्या क्रमांकावर कसे आले, असा सवालही धंडा यांनी उपस्थित केला.

पंजाबमधील ड्रग्जच्या समस्येवरुन आप सरकारवर टीका

दरम्यान, यावर प्रत्युत्तर देताना राघव चड्ढा यांनी आपच्या पंजाबमधील सरकारवर टीका केली. “पंजाबमध्ये आज ड्रग्जची परिस्थिती अशी आहे की, अमली पदार्थांसाठी लागणाऱ्या रांगा आणि रेशनच्या रांगा यामध्ये काहीच फरक उरलेला नाही,” अशी टीका चड्ढांनी केली. चिट्टा या अमली पदार्थाची थेट घराघरांमध्ये होम डिलिव्हरी होत असल्याचा गंभीर आरोपही चड्ढांनी केला. गेल्या १५ वर्षांत पंजाबमध्ये ड्रग्जची समस्या सातत्याने वाढल्याचे नमूद करत, ती रोखण्यासाठी ‘आप’ सरकारने नेमके काय केले, असा जाब चड्ढा यांनी विचारला.