Raghav Chadha BJP Entry Priyanka Chopra Role: आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी २४ एप्रिल २०२६ रोजी इतर ६ खासदारांसह ‘आप’ सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राघव चड्ढा यांनी सहा खासदारांना घेऊन अचानक पक्षांतर केल्याने केजरीवाल यांच्यासह पक्षाला मोठा धक्का बसला आहे. चड्ढा यांनी पक्षांतराबाबत भूमिका स्पष्ट करताना आप मूळ तत्वांपासून दूर गेल्याचा आरोप केला. तर, आपने चड्ढा यांचे पक्षांतर म्हणजे भाजपाबरोबर केलेलं षडयंत्र असल्याची टीका केली. दरम्यान, राघव चड्ढा यांच्या भाजपा प्रवेशाबाबत आता नवजोत सिंह सिद्धू यांच्या पत्नीने मोठा दावा आणि खळबळजनक दावा केला आहे.
प्रियांका चोप्राने चड्ढांना वाचवल्याचा दावा
नवजोत सिंह सिद्धू यांच्या पत्नी नवजोत कौर सिद्धू यांनी नुकतेच टॉप सिक्रेट या युट्युब चॅनेलच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यामध्ये त्यांनी राघव चड्ढा यांच्या भाजपा प्रवेशाबाबत खळबळजनक खुलासा केला. “राघव चड्ढा यांना भाजपमध्ये नेण्यात आणि त्यांना ईडीच्या कारवाईपासून वाचवण्यात अभिनेत्री प्रियांका चोप्राचा मोठा हात आहे”, असा दावा सिद्धू यांनी केला. “केजरीवाल यांच्याबरोबर मतभेद सुरु झाल्यानंतर आता चड्ढा यांच्यावर ईडीची छापेमारी होणार याची कल्पना आली होती. केंद्राकडे एकच हत्यार आहे”, असेही सिद्धू म्हणाल्या.
प्रियांकाची मध्यस्थी
“राघव चड्ढा यांच्या मागे ईडी लागणार आहे याची कल्पना प्रियांका चोप्राला आली होती. आपली बहीण परिणीती चोप्रा हिच्या पतीला वाचवण्यासाठी प्रियांकाने मध्यस्थी करून त्यांना भाजपामध्ये सुरक्षित स्थान मिळवून दिले”, असे नवजोत कौर सिद्धू या पॉडकास्टमध्ये बोलताना म्हणाल्या. “राघव चड्ढा आणि अरविंद केजरीवाल यांच्यात काही काळापासून मतभेद सुरू होते. राघव आता पक्षाच्या बाजूने बोलत नाहीत असे पक्षाला वाटू लागले होते”, असेही सिद्धू म्हणाल्या.
चड्ढा पक्ष सोडणार याची कल्पना होती – सिद्धू
“राघव चड्ढा आज साडेचार वर्षानंतर बोलत आहेत, ते त्यांना दीड वर्षापूर्वीच बोलायला हवे होते, काही चुकीचं होत असेल तर त्याचवेळी बोलायला हवं, त्यावेळी तर तुम्ही मलाई खाण्यात व्यग्र होते. राघ चड्ढा आपमधून बाहेर पडणार आहेत याची कल्पना पूर्वीच आली होती,” असे नवजोत कौर सिद्धू यांनी सांगितले. चड्ढा पक्षासाठी बोलत नाहीत याची कल्पना आल्यानंतर पक्ष मागेच लागल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली व वादाला सुरुवात झाल्याचा खुलासा त्यांनी केला. दरम्यान, या दाव्यांवर अद्याप राघव चड्ढा, प्रियंका चोप्रा किंवा परिणीती चोप्रा यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
