Raghav Chadha On AAP Split 2026 : गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पक्षात मोठ्या घडामोडी घडत आहेत. खासदार राघव चड्ढा यांच्यासह आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतील ७ खासदारांनी २४ एप्रिल रोजी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वेळातच राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांनी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेशही केला. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला.
दरम्यान, राघव चड्ढा यांच्यासह ‘आप’च्या या सात खासदारांनी आम आदमी पक्ष का सोडला आणि भाजपात जाण्याचा निर्णय का घेतला? यावरून अनेक उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. या चर्चांवर आता खासदार राघव चड्ढा यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत सविस्तर भाष्य केलं. आम आदमी पक्ष सोडण्यामागची कारणं आणि भाजपात प्रवेश करण्याची कारणं खासदार राघव चड्ढा यांनी सांगितली आहेत.
राघव चड्ढा यांनी काय म्हटलं?
“गेल्या तीन दिवसांपासून मला अनेकांचे फोन, मेसेज आले. अनेकांनी मला शुभेच्छा दिल्या, तर काही जणांना माझ्या या निर्णयाच्या मागचं कारण जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे हा व्हिडीओ त्या सर्वांसाठीच आहे. राजकारणात येण्याआधी मी एक चार्टर्ड अकाउंटंट होतो. माझ्या समोर एक चांगलं करिअर होतं, तरीही मी माझं करिअर सोडलं आणि राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. मात्र, मी माझं करिअर करण्यासाठी राजकारणात आलेलो नाही”, असं राघव चड्ढा यांनी म्हटलं आहे.
“मी एका (आम आदमी पक्ष) पक्षाचा सदस्य झालो. त्यानंतर त्या पक्षाला मी माझ्या आयुष्यातील १५ वर्ष दिले. मात्र, आजच्या घडीला आम आदमी पक्ष हा जुना आम आदमी पक्ष राहिलेला नाही. या पक्षात एक टॉक्सिक वातावरण निर्माण झालेलं आहे. काम करण्यापासून रोखलं जात आहे, संसदेत बोलण्यापासून रोखलं जात आहे, आज आम आदमी पक्ष हा भ्रष्टाचारी लोकांच्या हातात गेला आहे, जे लोक देशासाठी नाही, तर स्वत:च्या फायद्यासाठी काम करत आहेत”, अशी टीका राघव चड्ढा यांनी केली.
‘माझ्यासमोर तीनच पर्याय होते’ : राघव चड्ढा
“गेल्याकाही वर्षांपासून मला असं वाटत होतं की ‘राईट मॅन इन राँग पार्टी’. मी चुकीच्या पक्षात आहे. त्यामुळे माझ्यासमोर फक्त तीनच पर्याय होते. त्यातील पहिला पर्याय होता की, मी राजकारण सोडावं, दुसरा पर्याय होता की, मी याच पक्षात राहून पक्षातील काही गोष्टी ठीक करण्यासाठी प्रयत्न करावेत. पण ते काही झालं नाही. त्यानंतर माझ्यासमोर तिसरा पर्याय होता की, मी माझा अनुभव घेऊन सकारात्मक राजकारण करावं आणि दुसऱ्या पक्षात जाऊन एक सकारात्मक राजकारण करावं. त्यामुळे फक्त मी एकट्याने नाही, तर माझ्यासह एकूण सात सदस्यांनी हा निर्णय घेतला”, असं राघव चड्ढा यांनी सांगितलं आहे.
‘मी चुकीचा असेल, पण सात लोक चुकीचे कसे असतील?’
“मी चुकीचा असू शकतो. पण सात-सात लोक चुकीचे कसे असतील? एवढंच नाही तर जे चांगले उच्चशिक्षित लोक होते, ते देखील या पक्षाला (आप) याआधी सोडून गेलेले आहेत. मग ते देखील चुकीचे होते का?”, असा सवाल राघव चड्ढा यांनी विचारला आहे.
‘आप’ सोडण्याचा निर्णय का घेतला?
“तुम्ही असं समजा तुमच्या ऑफिसमध्ये काम करत असताना ऑफिसमधील वातावरण ‘टॉक्सिक’ झालं तर तुम्ही किती काम करू शकाल? जर तुम्हाला काम करण्यापासून रोखलं जात असेल तर तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकाल का? त्यामुळे अशा परिस्थिती योग्य निर्णय हा असतो की आपण ते वर्कप्लेस सोडून दिलेलं कधीही योग्य. त्यामुळे मी देखील अशाच प्रकारचा निर्णय घेतला”, असं राघव चड्ढा यांनी सांगितलं आहे.

भाजपाच्या गळाला लागलेले सात खासदार कोण?
राघव चड्ढा, अशोक मित्तल, संदीप पाठक, हरभजन सिंग, विक्रम सहानी, स्वाती मालीवाल आणि राजेंद्र गुप्ता यांचा यामध्ये समावेश आहे. यातील राघव चड्ढा, अशोक मित्तल, संदीप पाठक यांनी भाजपात अधिकृतरित्या प्रवेश देखील केला आहे.
भाजपाने ‘ऑपरेशन लोटस’ कसं राबवलं?
राज्यसभचे खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेच्या उपनेते पदावरून आम आदमी पक्षाने काही दिवसांपूर्वी हटवलं होतं. त्यामुळे खासदार राघव चड्ढा हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. मात्र, २४ एप्रिल रोजी खासदार राघव चड्ढा यांच्यासह काही खासदारांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर भाजपाने ‘ऑपरेशन लोटस’ नेमकं कसं राबवलं? याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
राज्यसभेतील ‘आप’चं संख्याबळ ३ वर
आम आदमी पक्षाचे राज्यसभेत एकूण १० खासदार होते. मात्र, यातील ७ खासदारांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्यानेआता राज्यसभेत आम आदमी पक्षाचं संख्याबळ १० वरून फक्त 3 वर आलं आहे. या तीनमध्ये संजय सिंह, संत बलबीर सिंग सीचेवाल आणि एन.डी.गुप्ता यांचा समावेश आहे.
