Raghav Chadha Joins BJP News Analysis: २८ दिवसांचा मोबाइल रिचार्ज आणि वापरला न गेलेला डेटा, शहरांमधील वाहतूक कोंडी, ब्लिंकिट डिलिव्हरी कर्मचाऱ्यांचे दुःख, विमानतळावरील महागडे खाद्यपदार्थ, राईट टू रिकॉल… असे अनेक विषय संसदेत मांडून खासदार राघव चड्ढा प्रसिद्धीच्या झोतात आले. जेन झी पिढीत राजकारण आणि राजकारण्यांचा तिटकारा वाढत असताना राघव चड्ढा यांच्याबद्दल मात्र त्यांना आकर्षण वाटू लागले होते. मात्र त्यातच चड्ढा यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेकांचा भ्रमनिरासही होत आहे. भाजपात सहा खासदारांसह डेरेदाखल झालेले हेच राघव चड्ढा दोन-एक वर्षापूर्वी भाजपाचे कट्टर विरोधक होते. लोकसत्ताच्या लोकसंवाद या कार्यक्रमात त्यांनी भारतात आणीबाणीसदृश वातावरण असल्याची आक्रमक टीकाही केली होती.
केंद्र आणि दिल्ली विधानसभेत सत्ता येताच सूर बदलले
सप्टेंबर २०२३ मध्ये खासदार राघव चड्ढा यांनी लोकसत्ताच्या मुंबई येथील कार्यालयात लोकसंवाद कार्यक्रमात सहभाग घेतला होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या या मुलाखतीत त्यांनी इंडिया आघाडीची स्थापना, त्यातील ‘आप’चा सहभाग, तसेच त्यांच्या पक्षातील लोकशाही कार्यपद्धती याबद्दल तोंडभरून कौतुक केले होते. मात्र २०२४ लोकसभा आणि २०२५ साली दिल्ली विधानसभेत भाजपाप्रणीत एनडीएचा विजय झाल्यानंतर राघव चड्ढा यांचा सूर बदलत गेला.
‘आप’मध्ये एकाधिकारशाही नाही
‘आप’मधून बाहेर पडल्यानंतर राघव चड्ढा यांनी एक सविस्तर व्हिडीओ प्रसारित करून पक्ष सोडण्याची कारणे दिली. “मी चार्टर्ड अकाउंटंट असून माझे करिअर सोडून मी एका (आम आदमी पक्ष) पक्षाचा सदस्य झालो. त्यानंतर त्या पक्षाला मी माझ्या आयुष्यातील १५ वर्ष दिले. मात्र, आजच्या घडीला आम आदमी पक्ष हा जुना आम आदमी पक्ष राहिलेला नाही. या पक्षात एक टॉक्सिक वातावरण निर्माण झाले आहे. आज आम आदमी पक्ष हा भ्रष्टाचारी लोकांच्या हातात गेला आहे, जे लोक देशासाठी नाही, तर स्वत:च्या फायद्यासाठी काम करत आहे”, अशी टीका चड्ढा यांनी केली.
पण हेच चड्ढा २०२३ साली म्हणाले होते, “आप पक्षात लोकशाही कार्यपद्धती असून अरविंद केजरीवाल यांची एकाधिकारशाही नाही. त्यामुळेच माझ्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण नेत्याला खासदार होण्याची संधी मिळाली.”
भाजपने विष कालवून राजकारण प्रदूषित केले
आम आदमी पक्षाचे कौतुक करत असताना राघव चड्ढा यांनी भाजपावर जोरदार टीका केली होती. “राजकीय पक्षांमध्ये पूर्वी मुद्द्यावर आधारित लढाई किंवा मतभेद होते. त्यात राजकीय शत्रुत्व कधीच नव्हते. मात्र भाजपने विष कालवून राजकारण प्रदूषित केले आहे. लोकसभेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांना देशाचे प्रतिनिधी म्हणून संयुक्त राष्ट्रांमध्ये भाषणासाठी पाठविण्यात आले होते. मात्र तो काळ आता गेला आणि राजकारणात वैरभाव आला आहे. ते दिवस पुन्हा येतील असे वाटत नाही”, अशी टीका चड्ढा यांनी केली होती.
देशात आणीबाणीसदृश वातावरण
एवढेच नाही तर देशात सध्या आणीबाणीच्या काळाप्रमाणे वातावरण असल्याचे चड्ढा म्हणाले होते. जनतेचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात असून विरोधी मते व्यक्त करणाऱ्यांमागे सीबीआय, प्राप्तीकर खाते, ईडी व अन्य यंत्रणांचा चौकशीचा ससेमिरा लागत आहे. चौकशीच्या नावाखाली अनेकांना तुरुंगात डांबले जात आहे, असेही ते म्हणाले होते.

विशेष म्हणजे, आता राघव चड्ढा यांच्याबरोबर जे सहा खासदार भाजपात सामील झाले आहेत, त्यांच्याविरोधातही केंद्रीय यंत्रणांनी चौकशीचा ससेमिरा लागल्याचा आरोप केला जात आहे.
भाजपाकडे भ्रष्टाचारी स्वच्छ करणारे यंत्र
इतर पक्षातून भाजपात गेलेल्या नेत्यांवरही चड्ढा यांनी तोफ डागली होती. “भाजपकडे भ्रष्टाचारी नेते व कार्यकर्त्यांना स्वच्छ करणारे यंत्र आहे. हे नेते विरोधी पक्षात असतात, तेव्हा भाजपकडून त्यांच्याविरोधात रान उठविले जाते. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच ते एकदम स्वच्छ चारित्र्याचे होतात आणि त्यांच्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप धुतले जातात. महाराष्ट्रातही राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना नेत्यांवरही आरोप झाले, पण या पक्षांतील काही नेते भाजपबरोबर गेल्यावर ते एकदम स्वच्छ झाले”, अशी जळजळीत टीका त्यांनी केली होती.
२० लाख लोकांनी केले अनफॉलो
राघव चड्ढा यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना जेन झींच्या नाराजीचा सामना करावा लागला. ज्या सोशल मीडियाने त्यांना डोक्यावर घेतले. त्याच सोशल मीडियावर त्यांना आता ट्रोलही केले जात आहे. भाजपात प्रवेश घेतल्यानंतर २४ तासांत चड्ढा यांचे इन्स्टाग्रामवरील जवळपास २० लाखांहून अधिक फॉलोअर्स कमी झाले. मागच्या आठवड्यात त्यांचे १४.६ दशलक्ष फॉलोअर्स होते. सोमवारी (२७ एप्रिल) ही संख्या १२.३ दशलक्षवर आली.
भाजपा प्रवेशाचे कारण काय?
२०२२ सालच्या पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये राघव चड्ढा यांच्याकडे महत्त्वाची भूमिका होती. आता यावर्षी होणाऱ्या पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाकडून त्यांचा वापर होऊ शकतो, अशी एक शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर अरविंद केजरीवाल मद्य धोरण प्रकल्पात तुरुंगात गेल्यानंतर राघव चड्ढा यांनीच ‘आप’पासून अंतर राखण्यास सुरुवात केली, असेही बोलले जात आहे.
दरम्यान राघव चड्ढा यांनी स्वतःहून भाजपात सामील होण्याचे कारण स्पष्ट केले आहे. व्हिडीओ संदेशात ते म्हणाले, “गेल्या काही वर्षांपासून मला असे वाटत होते की, ‘राईट मॅन इन राँग पार्टी’. मी चुकीच्या पक्षात आहे. त्यामुळे माझ्यासमोर फक्त तीनच पर्याय होते. त्यातील पहिला पर्याय होता की, मी राजकारण सोडावे, दुसरा पर्याय होता की, मी याच पक्षात राहून पक्षातील काही गोष्टी ठीक कराव्यात. पण ते काही झाले नाही. माझ्यासमोर तिसरा पर्याय होता की, मी माझा अनुभव घेऊन दुसऱ्या पक्षात जावे आणि एक सकारात्मक राजकारण करावे. त्यामुळे फक्त मी एकट्याने नाही, तर माझ्यासह एकूण सात सदस्यांनी हा निर्णय घेतला.”
म्हणून आप सोडण्याचा निर्णय घेतला
तुमच्या कार्यालयातील वातावरण ‘टॉक्सिक’ झाले तर तुम्ही काम करू शकाल का? जर तुम्हाला काम करू दिले जात नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी काम कराल का? अशा परिस्थितीत ते काम सोडून दिलेले कधीही योग्य. त्यामुळेच मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, असे स्पष्टीकरण आता राघव चड्ढा यांनी दिले आहे.
