गेल्या काही महिन्यांपासून देशात नीट पेपरफुटी प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे. नीट पेपरफुटी विरोधात कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीने दिल्लीत आंदोलन देखील करण्यात आलं होतं. या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला. याच आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला अनेक नेत्यांनी देखील भेटी दिल्या होत्या.
या सर्व घडामोडींवर खासदार राघव चढ्ढा यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नव्हती. नीट पेपरफुटी प्रकरण, कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीतील आंदोलन किंवा विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेला लाठीचार्ज, अशा कोणत्याही मुद्यांवर खासदार राघव चढ्ढा यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. मात्र, वेगवेगळ्या विषयांवर बोलणारे राघव चढ्ढा आता गप्प का? असा सवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी विचारला होता. या संपूर्ण घडामोडींवर आता पहिल्यांदा राघव चढ्ढा यांनी मौन सोडलं आहे. ‘नीट विद्यार्थ्यांचा राग रास्तच आहे, त्यांच्या भावना रास्त आहेत’, अशी प्रतिक्रिया चढ्ढा यांनी दिली.
‘कर्करोग फक्त क्रोसिनने बरा होत नाही, तसं फक्त ‘साउंडबाइट्स’ने प्रश्नपत्रिका फुटीची समस्या सुटू शकत नाही, त्यावर एका संस्थात्मक उपायाची गरज होती आणि आज सरकारने ते (सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक २०२६) केलं’, असं भाष्य राघव चढ्ढा यांनी संसदेत बोलताना केलं आहे.
राघव चढ्ढा यांनी काय म्हटलं?
“कर्करोग फक्त क्रोसिनने बरा होत नाही, तसं फक्त नीट पेपरफुटी सारख्या गंभीर घटनांवर कायमस्वरूपी उपाय काढण्याची गरज आहे. यावर एका संस्थात्मक पद्धतीनेच तोडगा निघेल, जे आता विधेयकाच्या माध्यमातून सरकार करत आहे. खरं तर माझ्या अनेक हितचिंतकांनी मला विचारलं होतं की तुम्ही नीट पेपरफुटीवर कधी बोलणार? आता मला त्यांना सांगायचं आहे की, आधी मी विरोधी पक्षात होतो, तेव्हा प्रश्न हे माझे शस्त्र होते. आता मी सत्ताधारी बाकावर आहे. त्यामुळे एखाद्या प्रश्नावर उपाय शोधणं ही माझी जबाबदारी आहे. अन्यथा मी सुद्धा रोज कॅमेऱ्यासमोर येऊन एखादी प्रतिक्रिया (साउंड बाइट) देऊ शकलो असतो. पण मला फक्त बातमीची हेडलाईन नको होती, तर ठोस परिणाम हवा होता”, असं स्पष्टीकरण राघव चढ्ढा यांनी दिलं.
“मी जेव्हा विरोधी पक्षामध्ये होतो, तेव्हा प्रश्न विचारणं आणि प्रश्न उपस्थित करणं ही माझी जबाबदारी होती, ते काम मी प्रामाणिकपणे केलं हे सभागृहाला माहिती आहे. मात्र, आज माझी भूमिका कॅमेऱ्यासमोर येऊन फक्त प्रश्न विचारण्याची नाही किंवा प्रतिक्रिया देण्याची नाही, तर ही व्यवस्था सुधारण्याची आहे. एखाद्या प्रश्नावर उपाय शोधण्याची आहे, त्यामुळे मी स्वतः असं ठरवलं होतं की, ज्या दिवशी आपण पेपरफुटीच्या समस्येवर उपाय आणू, त्या दिवशी संसदेत या विषयावर बोलू. आज तो ऐतिहासिक दिवस आहे”, असं म्हणत राघव चढ्ढा यांनी सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयकावरून केंद्र सरकारचं कौतुक केलं.
