Raghav Chadha To Join BJP AAP Split: देशाच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. आम आदमी पक्षात (आप) उभी फूट पडली असून, राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्यासह संदीप पाठक, अशोक मित्तल यांनी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राघव चड्ढा यांनी आज (२४ एप्रिल) दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन भाजपात प्रवेश करण्याचे जाहीर केल्यानंतर, काही वेळातच हा पक्षप्रवेश पार पडला. संविधानातील तरतुदीनुसार पक्षाचे राज्यसभेतील दोन तृतीयांश खासदार भाजपात विलीन होत असल्याचे खासदार चड्ढा यांनी सांगितले. अरविंद केजरीवाल यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
आपला मोठा धक्का
काही दिवसांपूर्वी राघव चड्ढा यांची राज्यसभेच्या उपनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. भारतीय जनता पक्षाची वाढती जवळीक पाहता पक्षाने त्यांना पदावरुन हटवल्याचे स्पष्टीकरण आपने दिले होते. चड्ढा भाजपात प्रवेश करण्याबाबत चर्चा सुरु होत्या मात्र, त्याबाबत अधिकृत माहिती समोर आली नव्हती. दरम्यान, आता चड्ढा यांनी पत्रकार परिषदेतून भाजपात प्रवेश करत असल्याचे स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर त्यांच्याबरोबर राज्यसभेतील दोन तृतीयांश खासदार (एकूण १० पैकी ०७ खासदार) असल्याचाही दावा त्यांनी केला. दरम्यान, या घोषणेनंतर काही वेळातच त्यांनी भाजपात संदीप पाठक, अशोक मित्तल यांच्यासह प्रवेश केला. त्यामुळे अरविंद केजरीवाल आणि पर्यायाने ‘आप’ला हा मोठा धक्का मानला जात आहे.
नितीन नबीन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
खासदार राघव चड्ढा यांनी संदीप पाठक, अशोक मित्तल यांच्यासह दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.
एकूण सात खासदार भाजपाच्या वाटेवर
खासदार राघव चड्ढा यांनी दिलेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, ‘राज्यसभेतील पक्षाते दोन तृतीयांश खासदार भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यास तयार आहेत’. राघव चड्ढा यांच्या व्यतिरिक्त, भाजपामध्ये सामील होणाऱ्या खासदारांमध्ये स्वाती मालीवाल, हरभजन सिंग, संदीप पाठक, अशोक मित्तल, राजिंदर गुप्ता आणि विक्रम साहनी यांचा समावेश आहे. राज्यसभेत असणाऱ्या आपच्या १० पैकी एकूण सात खासदार भाजपात प्रवेश करण्यास तयार असल्याचे चड्ढा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आप’वर आरोप
“ज्या आम आदमी पक्षाला मी माझे रक्त आणि घामाने वाढवले, माझ्या तारुण्याची १५ वर्षे दिली, तो पक्ष आता पक्षाची तत्त्वे, मूल्ये आणि मूळ नैतिकतेपासून भरकटला आहे. आता हा पक्ष राष्ट्राच्या हितासाठी नव्हे, तर स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी काम करतोय”, असा आरोप राघव चड्ढा यांनी केला. “मी योग्य व्यक्ती असूनही चुकीच्या पक्षात आहे, असे मला गेल्या काही वर्षांपासून मला जाणवत होते. तेव्हा आज मी ‘आप’पासून स्वतःला दूर करत आहे आणि जनतेच्या अधिक जवळ जात आहे असे जाहीर करतो”, असे चड्ढा म्हणाले.
केजरीवालांनी व्यक्त केली नाराजी
आम आदमी पक्षाने या फुटीवर प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी, “भाजपाने पुन्हा एकदा पंजाबीयांना धक्का दिला आहे”, अशी पोस्ट त्यांनी एक्सवर केली आहे. दरम्यान, या पक्षफुटीमुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
