Raghav Chadha removed from AAP Deputy Leader post latest updates : एकेकाळी अरविंद केजरीवाल यांचे सर्वात विश्वासू सहकारी राहिलेले आणि आम आदमी पक्षाचे ‘पोस्टर बॉय’ म्हणून ओळखले जाणारे खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवण्यात आले आहे. यानंतर ‘आप’चे खासदार चड्ढा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केल्या पोस्टला कॅप्शन म्हणून ‘इव्हिल आय’ इमोजीसह एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी आजवर राज्यसभेत उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांची झलक दाखवण्यात आली आहे.
व्हिडीओमध्ये काय आहे?
राघव चड्ढा या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत की, “या देशातील मध्यमवर्ग जीवतोड मेहनत करतो, पण इतकी मेहनत करूनही मध्यमवर्ग श्रीमंत नाही तर गरीबच होत चालला आहे. डेटासाठी आमच्याकडून जेवढे पैसे घेतले जातात, तेवढा डेटा आम्हाला वापरू दिला पाहिजे. तो एक्सपायर होऊ नये, हा डेटा आमच्या कष्टाच्या पैशातून खरेदी केलेला डेटा आहे.”
राघव चड्ढा या व्हिडीओमध्ये पुढे म्हणतात की, “मी प्रीपेड मोबाईल वापरकर्त्यांच्या वतीने दोन मुद्दे उपस्थित करू इच्छितो. पहिली समस्या म्हणजे रिचार्ज संपल्यानंतर आउटगोइंगबरोबर इनकमिंग सेवा देखील बंद होणे. दुसरी समस्या म्हणजे टेलिकॉम ऑपरेटर्सचा २८ दिवसांचा रिचार्ज. या जीवनात दोनच गोष्टी निश्चित आहेत, मृत्यू आणि कर. देशभरात आपण पाहिले की कशाप्रकारे पेपर लीक झाले आणि कशाप्रकारे मुलांचे भविष्य आज अंधकाराच्या उंबरठ्यावर उभे आहे. वायू प्रदूषणाचा सर्व दोष मात्र शेतकऱ्यांच्या माथी मारला जातो, म्हणून मी आज त्या शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करू इच्छितो. मी सरकारकडे मागणी करतो की, लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स यावर तरी किमान जीएसटी लावू नये. हे काही लक्झरी प्रॉडक्ट्स नाहीत. आज विमानतळावरील जेवण इतके महाग आहे, यावर कोणतेही नियंत्रण असू नये का? झोमॅटो आणि स्विगीच्या डिलिव्हरी बॉईजचे दुःख मला सभागृहात मांडायचे आहे,” असे अनेक मुद्दे राघव चड्ढा राज्यसभेत मांडताना या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत.
बोलायला वेळ न देण्याची विनंती
आम आदमी पक्षाने (आप) राज्यसभेतील खासदार राघव चड्ढा यांची पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी पंजाबचे अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात येत आहे. राज्यसभा सचिवालयाला एका अधिकृत पत्राद्वारे यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. राज्यसभेत जाणारे सर्वात तरुण खासदार असलेले चड्ढा (३७) यांनी राज्यसभेत मोबाईल डेटापासून ते पश्चिम आशियातील युद्धापर्यंतच्या अनेक मुद्द्यांवर अत्यंत प्रखरपणे आपली भूमिका मांडली.
मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षातील महत्त्वाच्या घडामोडींवर राघव चड्ढा यांनी बाळगलेले मौन आणि बैठकांना सतत गैरहजर राहणे यामुळे पक्ष नेतृत्व त्यांच्यावर नाराज होते. राघव चड्ढा यांची २०२३ मध्ये उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने फक्त त्यांचे पदच रद्द केले नाही, तर त्यांना सभागृहात बोलण्यासाठी वेळ देऊ नये, अशी विनंतीही राज्यसभा सचिवालयाकडे केली आहे.
पदावरून का हटवलं?
गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या घटना समोर येत होत्या, ज्यावरून राघव चड्ढा आणि आम आदमी पक्ष यांच्यात सर्व काही अलबेल नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.
गेल्या आठवड्यात ‘आप’ने आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून चड्ढा यांना वगळले होते. तसेच २०२५ साली दिल्ली निवडणुकीतील पक्षाच्या पराभवानंतर चड्ढा यांनी स्वतःला ‘आप’च्या धोरणांपासून दूर ठेवले होते. पक्षाचे विषय मांडण्याऐवजी त्यांनी समाजातील इतर वर्गाच्या विषयांना प्राधान्य दिले होते. तसेच फेब्रुवारी महिन्यात दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात न्यायालयाने ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि इतरांना दोषमुक्त केले होते. त्यानंतरही खासदार राघव चड्ढा यांनी कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिली नव्हती.
