Raghav Chadha slams AAP : राघव चड्ढा यांनी सहा राज्यसभा खासदारांबरोबर आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. पंजाबमधील ‘आप’ सरकार खासदारांविरुद्ध सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत असल्याबद्दल या भेटीत त्यांनी राष्ट्रपतींकडे तक्रार केली आहे. त्यांनी आपवर सुडाचे राजकरण करत असल्याचा आरोप करत मी त्यांचा पुढचा टार्गेट असणार आहे, असंही चड्ढा म्हणालेत. हा पक्ष एखाद्या वेड्या आणि दुखावलेल्या जोडीदारासारखा वागत असून तो पुढे जाण्यात तयार नाही, असंही त्यांनी म्हटंय.

माध्यमांशी बोलताना चड्ढा म्हणाले, “आम्ही राष्ट्रपतींना सांगितले की, ज्या खासदारांनी ‘आप’ सोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे, त्यांच्याविरुद्ध पंजाब सरकार सूडाचे राजकारण करत आहे. सरकारने आम्हाला सोशल मीडियावर धमकावण्यासाठी एजन्सी नेमल्या आहेत.”

चड्ढा यांनी ‘X’ वर राष्ट्रपतींसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, घटनात्मक हक्क आणि लोकशाही निवडीबाबत राष्ट्रपतींनी दिलेल्या आश्वासनामुळे त्यांना बळ मिळाले आहे. नुकतेच पंजाब प्रदूषण नियंत्रण मंडळ (PPCB) ने खासदार राजिंदर गुप्ता यांच्याशी संबंधित धौला येथील वस्त्रोद्योग युनिटवर छापा टाकला आणि खासदार संदीप गुप्ता यांच्याविरोधात दोन FIR दाखल झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर चड्ढा यांनी चिंता व्यक्त केली आहे.

चड्ढा यांनी असेही सांगितले की राष्ट्रपती मुर्मू यांच्यासोबतच्या बैठकीत नव्याने भाजपामध्ये सामील झालेल्या खासदारांना संरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले. “राष्ट्रपतींनी आमच्या संरक्षणाची आणि संविधानाचे रक्षण करण्याची हमी दिली आहे”, असं चड्ढांनी स्पष्ट केलं.

भाजपामध्ये सामील झाल्यानंतर काही दिवसांतच आपचे दोन माजी खासदार संदीप पाठक आणि राजिंदर गुप्ता यांच्यावर पंजाबमध्ये कारवाई झाली. PPCB ने धौला येथील ट्रायडेंट ग्रुपच्या युनिटवर छापे टाकले, तर स्रोतांच्या मते संदीप पाठक यांच्याविरोधात दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या. २०२२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसविरोधात आपला निर्णायक विजय मिळवून देण्यात पाठक यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे मानले जाते.