नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतील दहापैकी ७ खासदारांचा गट शुक्रवारी भाजपमध्ये विलीन झाला. त्यामध्ये कधी काळी केजरीवाल यांच्या अत्यंत नजीकचे मानले गेलेले राघव चड्ढा व स्वाती मालिवाल यांचा समावेश आहे. दहा महिन्यांवर आलेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपने ‘आप’ला जबरदस्त धक्का दिला आहे.

दिल्लीतील ‘कन्स्टिट्युशन क्लब’मध्ये शुक्रवारी दुपारी ३ वाजता अचानक भाजपच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ‘आप’ला सोडचिठ्ठी देणारे नेते राघव चड्ढा यांनी, राज्यसभेतील ‘आप’च्या दोनतृतीयांश सदस्यांनी (सात खासदारांच्या गटाने) संविधानातील तरतुदीनुसार भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला. सातही सदस्यांच्या स्वाक्षरीचे तसे पत्र राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांना दिले आहे, अशी माहिती दिली. पत्रकार परिषदेमध्ये चड्ढा यांच्याबरोबर अशोक मित्तल हेदेखील होते. केजरीवाल यांनी राज्यसभेतील ‘आप’चे उपगटनेते पदावरून चड्ढा यांची हकालपट्टी केल्यानंतर हे पद मित्तल यांना दिले होते. चड्ढा यांना पर्याय ठरलेले मित्तलच शुक्रवारी चड्ढा यांच्याबरोबर भाजपमध्ये सामील झाले. चड्ढा, मित्तल यांच्यासह संदीप पाठक, स्वाती मालिवाल, हरभजन सिंग, राजिंदर गुप्ता, विक्रम साहनी या ‘आप’च्या राज्यसभेतील सात खासदारांनी भाजपचे कमळ हातात घेतल्याचे चड्ढा यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेनंतर चड्ढा, मित्तल व पाठक या तिघांनी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात जाऊन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेऊन ‘आप’च्या फुटीर गटाचे औपचारिक विलीनीकरण केले. यावेळी चड्ढांचे इतर चार सहकारी भाजपच्या मुख्यालयात आले नव्हते, मात्र स्वाती मालिवाल यांनी विलीनीकरणाच्या घोषणनेनंतर ‘एक्स’वर केजरीवाल व ‘आप’विरोधात टिप्पणी केल्यामुळे या पक्षातील फुटीवर शिक्कामोर्तब झाले.

राज्यसभेत ‘आप’चे दहा खासदार असून त्यापैकी ७ सदस्यांचा गट भाजपमध्ये विलीन झाला असल्याने त्यांना पक्षांतर्गत बंदी कायदा लागू होत नाही. महाराष्ट्रामध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांत फूट पडली तरी हे फुटीर गट भाजपमध्ये विलीन झाले नाहीत. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग व त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेद्वारे मूळ पक्ष निश्चित करण्यासाठी न्यायनिवाडा करावा लागला. मात्र राघव चड्ढांच्या नेतृत्त्वाखालील गट थेट भाजपमध्ये विलीन झाला असल्याने त्यांचे राज्यसभेतील सदस्यत्वही अबाधित राहणार आहे, तसेच त्यांना कोणत्याही न्यायसदृश प्रक्रियेलाही सामोरे जाण्याची गरज उरलेली नाही. राज्यसभेत आता ‘आप’चे संत बलबीर सिंग सीचेवाल, संजय सिंह आणि एन. डी. गुप्ता हे तीनच सदस्य उरले आहेत.

चड्ढा यांचे पक्षावर गंभीर आरोप

ज्या आम आदमी पक्षाला मी माझ्या रक्ताने आणि घामाने जोपासले आणि ज्याला मी माझ्या तारुण्यातील १५ वर्षे समर्पित केली, तो पक्ष आता आपल्या तत्त्वांपासून, मूल्यांपासून आणि मूळ नैतिकतेपासून पूर्णपणे भरकटला आहे. हा पक्ष आता देशासाठी किंवा राष्ट्रीय हितासाठी नव्हे, तर केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी काम करत आहे, असा गंभीर आरोप राघव चड्ढा यांनी पत्रकार परिषदेत केला. तुमच्यापैकी अनेकांनी गेल्या काही वर्षांपासून मला हीच गोष्ट वारंवार सांगितली आहे आणि मलाही वैयक्तिकरीत्या असेच जाणवले आहे की, मी एका चुकीच्या पक्षात असलेला योग्य माणूस आहे. म्हणूनच आज मी अशी घोषणा करत आहे की, मी आम आदमी पक्षापासून स्वतःला अलिप्त करत आहे आणि आता जनतेच्या दरबारात जात आहे, असे चड्ढा म्हणाले.

भाजपमधील विलीनीकरणाला आव्हान देण्याची शक्यता

फुटीर गटाच्या भाजपमधील विलीनीकरणाला ‘आप’कडून आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. फुटीर खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी आपने केली आहे. मी राज्यसभेच्या सभापतींना पत्र देणार असून राघव चड्ढा, अशोक मित्तल आणि संदीप पाठक भाजपमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे त्यांना राज्यसभा सदस्य म्हणून अपात्र घोषित करावे अशी मागणी करणार आहे, असे आपचे राज्यसभेतील गटनेते संजय सिंह यांनी सांगितले. संविधानाच्या दहाव्या अनुसूचीनुसार स्वेच्छेने पक्षाचा त्याग करण्याजोगे असल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द झाले पाहिजे, असे संजय सिंह म्हणाले.

केजरीवाल, संजय सिंह यांची भाजपवर टीका

‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी अगदी मोजक्या शब्दांत ‘ऑपरेशन कमळ’वर टिप्पणी केली आहे. ‘एक्स’वर केजरीवाल यांनी, भाजपने पुन्हा पंजाबी लोकांचा विश्वासघात केला आहे, असे नमूद केले. केजरीवाल यांचे सहकारी संजय सिंह यांनी भाजपवर तीव्र टीका केली. भाजपने पंजाब सरकारवर ‘ऑपरेशन लोटस’ केले. त्यासाठी ईडी आणि सीबीआयचा वापर केला. पंजाबची जनता या ‘गद्दारांना’ कधीही विसरणार नाही, असा प्रहार संजय सिंह यांनी केला. अशोक मित्तल यांच्या ठिकाणांवर छापे टाकून त्यांना भीती दाखवली गेली, असा आरोपही सिंह यांनी केला. ज्यांनी पंजाबच्या शेतकऱ्यांच्या विरोधात तीन कृषी कायदे मंजूर केले होते, त्याच पक्षात सामील होऊन, तुम्ही प्रामाणिकपणा आणि सत्यासाठी लढणार आहात का, असा सवाल सिंह यांनी चड्ढा व त्यांच्या फुटीर सदस्यांना केला.