पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यापाठोपाठ राजकीय हालचाली वेगवान झाल्या असतानाच काँग्रेसमध्ये तुलनेने शांतता आहे.. कारण काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी नववर्ष साजरा होऊन आठवडा झाल्यानंतरही परदेशातून परतलेले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये नोटाबंदीविरोधात काँग्रेसने शुक्रवारी केलेल्या देशव्यापी आंदोलनात कोणतीही जान नव्हती. राहुल यांच्या या कृतीवर काँग्रेसमध्येच नाराजी आहे; पण उघडपणे बोलण्यास कोणीही तयार नाही.

‘तिकडे नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी संपूर्ण भाजपची यंत्रणा कामाला लावली असताना आमचा नेता देशातच नाही. उत्तराखंडमधील सत्ता टिकविण्याची आणि पंजाब जिंकण्याची संधी चालून आली आहे. अखिलेशसिंह यादवांबरोबर युती झाल्यास उत्तर प्रदेशातही चांगली कामगिरी होऊ  शकते. असे असताना ऐन मोक्याच्या क्षणी राहुलजी परदेशात असण्याने चांगला संदेश जात नाही. अगोदरच त्यांची प्रतिमा ‘नॉन सीरियस’ आहे. अशा कृतीने ती आणखी घट्ट होते,’ अशी टिप्पणी एका ज्येष्ठ नेत्याने केली.

‘राहुल आणि परिवार नेहमीच नववर्षांनिमित्त परदेशात सहलीला जातात. त्यात नवे काही नाही. पण यंदा त्यांनी जाण्याचे टाळायला हवे होते किंवा दोन-तीन दिवसांत परतायला हवे होते. आता आठवडा उलटलाय. इथे मुख्यालयात (२४, अकबर रोड ) पाच राज्यांतील इच्छुकांची गर्दी आहे. रणनीतीला अंतिम आकार द्यायचाय. राहुल यांच्या अनुपस्थितीने नाही म्हटले तर तयारीचा खोळंबा होणारच,’ असा दुजोरा दुसऱ्या एका नेत्याने दिला. पण त्याने दिलेल्या माहितीनुसार, राहुल ताजेतवाने होऊन एक-दोन दिवसांत परत येतील आणि ८ मार्चपर्यंतच्या रणधुमाळीत स्वत:ला झोकून देतील.

या दोन नेत्यांप्रमाणेच कार्यकर्त्यांनाही राहुल यांचे अशावेळी परदेशात सुट्टीसाठी जाणे पटलेले नाही. ‘२४, अकबर रोड’वरील मुख्यालयात सध्या इच्छुक व त्यांच्या समर्थकांची बरीच गर्दी आहे. विशेषत: त्यामध्ये पंजाबमधील नेत्यांचा जास्त भरणा आहे. बहुतेकांचा जीव टांगणीला लागलाय. त्यापैकी एकाला विचारले असता तो म्हणाला, ‘दहा-बारा दिवसांपासून इथे येतोय. पण हाती काही लागत नाही. राहुलजी आल्यानंतर बघू, असे सांगितलं जातंय.’

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल २९-३० डिसेंबरला रवाना झाले. ते कोणत्या ठिकाणी सुट्टीसाठी गेलेत, याची अधिकृत माहिती नाही. काही जणांच्या मते ते अमेरिकेत आहेत, तर काहींच्या मते लंडनमध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अमेरिकेत आघाडी बांधण्याचा त्यांचा प्रयत्न चालू असल्याचे सांगितले जाते. ‘मोदी म्हणजे भारत नव्हे,’ आणि ‘मोदींना भारतात मोठा विरोध आहे,’ हे अमेरिकेला दाखविण्याचा हेतू त्यामागे असल्याचे म्हटले जात आहे.