पीटीआय, नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी ५६वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने काँग्रेस पक्षाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी, द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षाच्या नेत्यांनी राहुल यांना शुभेच्छा दिल्या. तमिळनाडू विधानसभा निवडणूक निकालानंतर ‘टीव्हीके’ आणि द्रमुक या दोन्ही पक्षांबरोबर काँग्रेसची समीकरणे बदलली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरून राहुल गांधी यांना निरोगी आणि दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यावर राहुल यांनी त्यांचे आभार मानले. विजय यांनी राहुल यांचा उल्लेख ‘प्रिय बंधू’ असा केला. तर यापूर्वी राहुल यांना ‘आपला बंधू’ म्हणणारे स्टॅलिन यांनी यावेळी ‘विरोधी पक्षनेते’ असा औपचारिक उल्लेख केला. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राहुल हे आपले समविचारी असल्याचे म्हणत त्यांना शुभेच्छा दिल्या. राजदचे तेजस्वी यादव, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, राष्ट्रवादीच्या (शरद पवार) सुप्रिया सुळे, यांनीही राहुल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
काँग्रेस पक्षाच्या २४, अकबर रोड येथील कार्यालयात राहुल यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. राहुल गांधी यांनी सत्याची कास धरत सातत्याने गरीब आणि वंचित समाजाच्या समस्या उपस्थित केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांचे कौतुक केले.दरम्यान, काँग्रेसने राहुल गांधी यांना परशुरामाच्या वेशात दाखवून हिंदू श्रद्धेचा अपमान केल्याची टीका भाजपने केली. वाराणसी येथे युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुल यांचा वाढदिवस साजरा करताना त्यांना परशुरामाच्या वेशात दाखवले होते.
