लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर आणि निवडणूक प्रक्रियेवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला चढवला आहे. “भाजपच्या २४० खासदारांपैकी दर सहावा खासदार हा मतांच्या चोरीतून निवडून आला आहे,” असा खळबळजनक दावा राहुल गांधी यांनी बुधवारी त्यांच्या अधिकृत ‘X’ (ट्विटर) अकाऊंटवरून केला. केवळ खासदारच नाही, तर हरियाणातील संपूर्ण सरकारच ‘घुसखोर’ असल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे.

१४० जागांचा संख्याही पार करता आला नसता!

राहुल गांधी यांनी भाजपाच्या निवडणूक विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले की, जर देशात निवडणुका निष्पक्ष पद्धतीने पार पडल्या असत्या, तर भाजपाला १४० पेक्षा जास्त जागा जिंकणे शक्य झाले नसते. “कधी मते चोरून जागा जिंकल्या जातात, तर कधी संपूर्ण सरकारच चोरले जाते. भाजपच्या भाषेत सांगायचे तर, या खासदारांना आपण ‘घुसखोर’ म्हणायचे का?” असा बोचरा सवाल त्यांनी विचारला आहे.

संस्थात्मक स्वायत्ततेवर टीका करताना ते म्हणाले की, “निवडणूक आयोग आणि इतर संस्था भाजपाच्या खिशात आहेत. मतदार याद्यांमध्ये फेरफार करणे आणि निवडणूक प्रक्रियेत गडबड करणे हे सर्व ‘रिमोट कंट्रोल’द्वारे चालवले जात आहे.”

बंगाल आणि आसाममध्येही ‘व्होट चोरी’चा दावा

राहुल गांधी यांनी केवळ लोकसभेवरच नाही, तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांवरही शंका व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आरोपांचे समर्थन करत त्यांनी म्हटले की, “बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या १०० हून अधिक जागा चोरण्यात आल्या आहेत. आसाम आणि बंगाल ही निवडणूक चोरीची स्पष्ट उदाहरणे आहेत.” मध्यप्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्येही भाजपने याच ‘प्लेबुक’चा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला.

किरेन रिजिजू यांचे जोरदार प्रत्युत्तर

राहुल गांधींच्या या आरोपांनंतर सत्ताधारी भाजपाकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधींना जनतेच्या कौलाचा आदर करण्याचा सल्ला दिला.

“राहुल गांधीजी, कृपया जनतेच्या जनादेशाचा आदर करायला शिका. तुम्ही जेवढे घटनात्मक संस्थांवर हल्ले कराल, तेवढी तुमची स्वतःची उरलेली विश्वासार्हता संपेल. सरकारच्या धोरणांवर टीका करा, आमच्यावर हल्ला करा, पण भारताच्या संविधानाचा अपमान करू नका,” असे रिजिजू यांनी प्रत्युत्तरात म्हटले आहे.

तसेच, काँग्रेसने मुस्लिमांना केवळ ‘व्होट बँक’ म्हणून वापरल्यामुळेच त्यांचे नेतृत्व अपयशी ठरत असल्याची टीकाही रिजिजू यांनी केली. राहुल गांधींच्या या दाव्यांमुळे आता देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.