नवी दिल्ली : लोकसभेत बुधवारी प्रचंड गोंधळात ‘सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक, २०२६’ आवाजी मतदानाने संमत करण्यात आले. या विधेयकावरील चर्चेत सहभागी झालेले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य केले. जंतर-मंतरवरील आंदोलकांच्या मोर्चात विद्यार्थ्यांना गोळ्या घालण्याचा आदेश पोलिसांना अमित शहांनी दिल्याचा गंभीर आरोप राहुल यांनी केला. चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राहुल यांचे आरोप खोडून काढले. २० जुलैच्या मोर्चामध्ये गोळीबार झाला नाही, केवळ अश्रूधुराचा वापर करण्यात आला, असे जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
राहुल यांनी अमित शहांना लक्ष्य केल्याने सत्ताधारी सदस्य कमालीचे आक्रमक झाले. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसच्या सदस्यांनी ओरडा-आरडा करण्यास सुरुवात केली. घोषणाबाजीमुळे सभागृहात गदारोळ झाला. त्यातच, राहुल गांधींनी पुरावे द्यावेत किंवा माफी मागावी अशी मागणी केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी केली. पण, परिस्थिती नियंत्रणात न आल्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज तहकूब केले.
अमित शहा लोकसभेत न आल्याबद्दलही राहुल यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘‘या देशाच्या तथाकथित गृहमंत्र्यांमध्ये इथे येऊन बसण्याचे धाडस नाही. मी गृहमंत्र्यांचा ताफा पाहिला, ३० गाड्यांचा ताफा आणि त्यात बसलेले गृहमंत्री. ते घाबरलेले आणि थरथर कापताना दिसले. गृहमंत्री आज इथे का आले नाहीत? ते आज इथे नाहीत कारण ते घाबरलेले आहेत. विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनीच दिले होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शरीरात छर्रे घुसवले.’’
राहुल यांच्या या विधानाला सत्ताधारी सदस्यांनी टोकाचा विरोध केला. ‘राहुल गांधी माफी मांगो,’ अशा घोषणा दिल्या गेल्या. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना, फक्त विधेयकावरच बोला, अशी सूचना केली. मात्र, पोलिसांना बळाचा वापर करण्याचा आदेश गृहमंत्री वा पंतप्रधान देऊ शकतात. त्यांच्यापैकी कोणी हा आदेश दिला हे समजले पाहिजे, अशी मागणी राहुल गांधींनी केली.
सत्ताधारी बाकांवरून बचाव
केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी, केंद्रीय गृहमंत्र्यांवर असे आरोप करता येणार नाहीत. ‘‘आम्ही या आरोपांकडे हलकेपणाने पाहू शकत नाही. उद्या कोणीही उठून काहीही बोलू शकेल. हे योग्य नाही. तुम्हाला हे कसे समजले (शहांनी आदेश दिला) आणि कोणत्या आधारावर समजले, हे तुम्ही स्पष्ट केले पाहिजे आणि माफी मागितली पाहिजे,’’ असे सांगितले. भाजपचे खासदार अनुराग ठाकूर, संजय जयस्वाल, निशिकांत दुबे, केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल, गिरीराज सिंह अशा अनेक सदस्यांनी एकाचवेळी राहुल गांधींविरोधात आक्षेपाच्या फैरी झाडल्या. या गदारोळातच बिर्ला यांनी, हे विधेयक गृहमंत्रालयाशी संबंधित नाहीत. त्यामुळे शहांनी सभागृहात उपस्थित राहिलेच पाहिजे असे नाही, असे स्पष्ट केले. राहुल गांधींनी पुरावे सभागृहात सादर केले जात नाहीत तोपर्यंत विरोधी पक्षनेत्याचे म्हणणे इतिवृत्तांतामध्ये समाविष्ट केले जाणार नाही, असेही बिर्लांनी सांगितले.
माफी मागणार नाही!
कामकाज तहकूब झाल्यानंतर संसदेच्या आवारात राहुल गांधींनी पुन्हा शहांवर आरोप केले. ‘‘इथे दोन शक्यता दिसतात. विद्यार्थ्यांची हत्या करण्याचे आदेश शहांनी दिले होते किंवा विद्यार्थ्यांवर गोळीबार केला गेला हेच शहांना माहीत नाही. दोन्ही शक्यतांमध्ये शहा दोषी ठरतात आणि ते अकार्यक्षम असल्याचे स्पष्ट होते,’’ अशी टीका राहुल गांधींनी केली. यानंतर काँग्रेसचे मुख्यालय इंदिरा भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी, माफी मागणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत भाजपला आव्हान दिले. राजनाथ सिंह, किरेन रिजिजू यांना वारंवार बोलू दिले गेले. मी माफी मागितली तर मला लोकसभेत बोलू दिले जाईल असे आश्वासन देण्यात आले. मात्र, मी माफी मागणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल म्हणाले, ‘‘मोर्चाच्या दिवशी मी स्वत: अमित शहांनी पोलिसांना आदेश देताना पाहिले आहे. माझ्या डोळ्यांनी मी शहांना पोलिस अधिकार्यांना फोन करताना पाहिले आहे. जितेंद्र सिंह यांना शहा वारंवार फोन करत असल्याचेही मी पाहिले आहे.’’ पंतप्रधान मोदींनी शहांची हकालपट्टी करावी, अशी मागणीही राहुल गांधींनी केली.
विद्यार्थी, मूर्ख आणि अंधभक्त!
लोकसभेत राहुल गांधींनी भाषणाची सुरुवात एका विद्यार्थिनीशी झालेल्या संवादाची माहिती देऊन केली. ‘‘लोकांच्या विद्यार्थी, मूर्ख आणि अंधभक्त अशा तीन श्रेणी असतात,’’ असे राहुल या संवादाचा संदर्भ देऊन म्हणाले. राहुल यांच्या या शब्दांवर सत्ताधारी सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला व ‘मूर्ख’ हा शब्द असंसदीय असल्याने इतिवृत्तातून काढून टाकण्याची मागणी केली. त्यानुसार हा शब्द काढूनही टाकला गेला. ‘
‘हा शब्द तुम्हाला उद्देशून वापरलेला नाही. विद्यार्थिनी काय म्हणाली हे मी सांगत होतो,’’ असे म्हणत राहुल यांनी भाषण सुरू ठेवले. मात्र, केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी, या शब्दावर आक्षेप घेत, विद्यार्थ्यांच्या आडून राहुल गांधी असंसदीय शब्दांचा वापर करत असल्याचा आरोप केला. दुसरीकडे, भाजपच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे खासदार संबित पात्रा यांनी ‘मूर्ख’ शब्दाचा वापर केला. देशातील एकही विद्यार्थी ना मूर्ख आहे ना अंधभक्त, असे प्रत्युत्तर पात्रा यांनी दिले.
एका विद्यार्थिनीने मला सांगितले की लोकांच्या तीन श्रेणी असतात. एक, विद्यार्थी. म्हणजे खुल्या मनाने एखाद्या गोष्टीचा स्वीकार करणारे. दुसरी श्रेणी मूर्खांची. अशा व्यक्तींना आपण देव आहोत असे वाटते, त्या उद्धट असतात. तिसरी श्रेणी अंधभक्तांची. दुसरी व्यक्ती देव आहे याची खात्री असते असे लोक अंधभक्त असतात. – राहुल गांधी, विरोधी पक्षनेता, लोकसभा
– गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले, त्यानंतर थेट केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयकावरील चर्चेला उत्तर दिल्याने राहुल गांधींचे भाषण अपूर्ण राहिले. ‘‘विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश आदेश गृहमंत्री वा पंतप्रधान देत नाहीत. हा आदेश देण्याचे अधिकार दंडाधिकार्यांकडे असतात. गोळीबार झालाच नाही तर शहांनी आदेश देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’’ असेही सिंह म्हणाले.
– पोलिसांनी अत्यंत संयमाने कारवाई केल्याचा दावा सिंह यांनी केला. मोर्चात जीवितहानी होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. १९७९-८४ या काळात आसाममध्ये ‘आसू’च्या आंदोलनात ८६० जणांचा बळी गेला होता, त्यामध्ये बहुतांश विद्यार्थी होते. तेव्हा काँग्रेसचे सरकार होते, अशी आठवण जितेंद्र सिंह यांनी करून दिली.
शिक्षणव्यवस्था संघाच्या ताब्यात
लोकसभेतील भाषणामध्ये राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर शिरसंधान साधले. धर्मेंद्र प्रधान हे केवळ एक प्रतीक आहेत, खरा शत्रू तर संघ आहे. हे असे लोक आहेत ज्यांना तुम्ही ह्य्अंधभक्तह्ण बनावे असे वाटते, अशी टीका राहुल गांधींनी केली. सर्व काही खासगी कंपन्यांच्या हवाली केले जात आहे. ही लूटमार करणारी, भयानक व्यवस्था आहे. या व्यवस्थेचा आत्माच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ताब्यात घेतला आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला.
पंतप्रधान होण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी राहुल गांधींना ‘फोमो’ने ग्रासले आहे. सभागृहात तथ्यहीन बोलणे हे विरोधी पक्षनेत्याला शोभत नाही. इतकी वर्षे होऊनही पंतप्रधान होता न आल्याच्या नैराश्यापोटीच २१ जुलैला ते पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर जाऊन बसले होते. – जितेंद्र सिंह, केंद्रीय मंत्री
