अयोध्येत राम मंदिराचे निर्माण करताना अनेकांची जमीन बळकावली गेली. दुकानं, घरं तोडण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येतील जनतेला घाबरवून सोडलं. त्यामुळेच त्यांना तिथून निवडणूक लढविण्यास सर्व्हे करणाऱ्या एजन्सीने विरोध केला होता. पंतप्रधान मोदींनी ज्याप्रकारे अयोध्येतील जनतेला घाबरवले आहे, त्याचप्रकारे त्यांनी भाजपामधील नेत्यांनाही भीतीच्या सावटाखाली ठेवलं आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गंधी यांनी आज लोकसभेत विरोधी पक्षनेता या नात्याने पहिल्याच भाषणात बोलताना केला. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांचे नाव घेताच, सभागृहात भाजपाच्या खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. राज्यपालांच्या अभिषाषणावर बोलत असताना राहुल गांधी म्हणाले, "पंतप्रधान मोदींनी अयोध्येसह संपूर्ण देशाला घाबरवून सोडलं आहे. मी आज सकाळी लोकसभेत आलो तेव्हा राजनाथ सिंह यांनी हसत हसत मला नमस्ते म्हटलं. पण मोदीजी सभागृहात येताच त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य उडून गेलं. एकदम गंभीर चेहरा करून ते बसले आहेत. आता ते नमस्तेही करत नाहीत. कारण मोदी पाहतील. नितीन गडकरींचं असंच आहे. अयोध्या सोडाच पण यांनी भाजपा नेत्यांनाही भीतीच्या सावटाखाली ठेवलं आहे." “नरेंद्र मोदी अयोध्येतून लढले असते तर निश्चित पराभूत झाले असते”, राहुल गांधींची पहिल्याच भाषणातून टीका राजकीय पक्षातही लोकशाही हवी "पंतप्रधान मोदी जिथे पाहतात, तिथे भीती निर्माण करतात. लष्कर, शेतकरी, युवक, मजूर, महिला या घटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एवढंच नाही तर भाजपातही भीतीचे वातावरण आहे. हे सत्य आहे. मी हे बोलल्यानंतर सभागृहातला एकही भाजपाचा खासदार ओरडत नाहीये. माझ्या भाषणात अडथळा आणत नाही. याचा अर्थ मी जे बोलतोय ते सत्यच आहे. लोकशाहीत राजकीय पक्षातही बोलण्याचे स्वातंत्र्य असले पाहीजे. आमच्याकडे सर्व पक्षात लोकशाही आहे. पण भाजपा पक्षात भीतीचे वातावरण आहे", अशी टीका राहुल गांधींनी केली. भारत जोडो यात्रेत चालत असताना लोकांनी महागाई, बेरोजगारीबद्दल काय काय सांगितले होते, याचीही आठवण राहुल गांधी यांनी सभागृहात करून दिली. महागाई आणि बेरोजगारीमुळे देशातील जनता दहशतीच्या सावटाखाली आहे, असा आरोप त्यांनी केला. “परमात्मा नरेंद्र मोदींशी रोज संवाद साधतो, ते महात्मा गांधींबाबत..”, पहिल्याच भाषणात राहुल गांधींची टोलेबाजी राहुल गांधी पुढे म्हणाले की, भाजपाने जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेतला. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच हे कृत्य झाले. मणिपूरमध्ये गृहयुद्धाच्या दरीत ढकलले. तुमच्या राजकारणामुळे मणिपूर पेटत आहे. आजपर्यंत भारताचे पंतप्रधान मणिपूरमध्ये गेलेले नाहीत. मणिपूरचा भारताचा भागच नाही. पंतप्रधानांसाठी बहुतेक मणिपूर हे राज्यच अस्तित्त्वात नाही. मी मणिपूरमध्ये जाऊन कुकी आणि मैतेईंशी बोललो. त्यांनी मला तिथली भयानक परिस्थिती सांगितली. भाजपाला याबद्दल लाज वाटली पाहीजे. तुम्ही म्हणजे पूर्ण हिंदू समाज नाही राहुल गांधी यांनी हिंदू धर्मावरूनही भाजपावर टीका केली. "नरेंद्र मोदी म्हणजे पूर्ण हिंदू समाज नाही. भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ संपूर्ण हिंदू समाज नाही. हिंदुत्वाचे कंत्राट फक्त भाजपाने घेतलेले नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी भाजपावर केली.