पीटीआय, नवी दिल्ली कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येवरून ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. दरम्यान पीडितेला न्याय देण्याऐवजी रुग्णालय आणि स्थानिक प्रशासनाकडून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या भीषण घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या अमानवी कृत्याने डॉक्टर आणि महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ‘पीडितेला न्याय देण्याऐवजी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न रुग्णालय आणि स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न निर्माण करतो,’ असे राहुल यांनी ‘एक्स’वरील संदेशात म्हटले. या घटनेने विचार करायला भाग पाडले आहे. वैद्याकीय महाविद्यालयासारख्या ठिकाणी डॉक्टरच सुरक्षित नसतील तर पालक आपल्या मुलींना बाहेर शिक्षणासाठी कसे पाठवतील, निर्भया प्रकरणानंतर केलेले कठोर कायदेही असे गुन्हे रोखण्यात यशस्वी का झाले नाहीत, असे प्रश्न राहुल यांनी उपस्थित केले आहेत. हेही वाचा >>>थायलंडच्या पंतप्रधानांना पदावरून हटवले; नैतिकतेचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयाचे आदेश ‘हाथरस ते उन्नाव आणि कठुआ ते कोलकाताच्या घटनेवरून महिलांवरील अत्याचार सातत्याने वाढत असल्याचे समोर येते. अशा घटनांवर प्रत्येक राजकीय पक्ष, समाजातील प्रत्येक घटकाला गंभीर चर्चा करून ठोस पावले उचलावी लागतील. पीडित कुटुंबीयांच्या वेदनांमध्ये मी पाठीशी उभा आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळाला पाहिजे आणि दोषींना अशी शिक्षा मिळावी की ते समाजात उदाहरण म्हणून काम करेल,’ असेही राहुल यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे. तत्पूर्वी या हत्येचा तपास कोलकाता पोलिसांकडून केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे (सीबीआय) हस्तांतरित करण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले आहेत. आसाममधील ‘तो’ निर्णय मागे गुवाहाटी : आसाममधील सिलचर रुग्णालयाने बुधवारी महिला डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळी एकट्याने जाणे टाळण्यास सांगणारा निर्णय मागे घेतला आहे. कोलकाता येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाचे प्राचार्य आणि मुख्य अधीक्षक डॉ. भास्कर गुप्ता यांनी हा निर्णय जारी केला होता. आधी जाहीर केलेला निर्णय रद्द केला असून, या संदर्भात लवकरच नवीन निर्णय जाहीर केला जाईल, असे डॉ. गुप्ता यांनी सांगितले. हेही वाचा >>>‘ईडी’च्या संचालकपदी राहुल नवीन यांची नियुक्ती आंदोलनाने आरोग्य सेवा वेठीस ● पश्चिम बंगालमधील कनिष्ठ डॉक्टरांनी बुधवारी सहाव्या दिवशी सरकारी वैद्याकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हत्येच्या निषेधार्थ काम बंद ठेवले. या सुरू असलेल्या आंदोलनाचा मोठा परिणाम आरोग्य सेवांवर झाला. परिणामी सर्व सरकारी रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागांमध्ये (ओपीडी) रुग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ●आंदोलक कनिष्ठ डॉक्टरांनी दंडाधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणाची चौकशीची आणि आंदोलक ज्युनियर डॉक्टरांतर्फे महिला डॉक्टरच्या हत्येची दंडाधिकारी चौकशी आणि आर.जी. कार वैद्याकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना काढून टाकण्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन सुरू आहे.