नोटाबंदीवरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राहुल गांधींनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आता सर्वोच्च न्यायालयालाही ‘राष्ट्रविरोधी’ म्हणणार काय, असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला केला आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटरवर नोटाबंदीच्या केंद्राने घेतलेल्या निर्णयावर टीका केली. सर्वोच्च न्यायालयाने नोटाबंदीनंतर केंद्र सरकार आवश्यक उपाययोजना करण्यात कमी पडल्याचे सांगत अशीच परिस्थिती राहिल्यास देशात लवकरच दंगलीही होतील असे म्हटले होते. न्यायालयाच्या याच वक्तव्याचा आधार घेत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली. आता सरकार सर्वोच्च न्यायालयालाही ‘राष्ट्रविरोधी’ म्हणणार का असा सवाल करत त्यांनी इंडियन एक्स्प्रेसची बातमी ट्विटबरोबर टॅग केली आहे. या वृत्तानुसार कोलकाता उच्च न्यायालयाने सरकारने हे पाऊल उचलण्यापूर्वी पूर्व तयारी केली नव्हती का असा प्रश्न उपस्थित केला होता. तर सर्वोच्च न्यायालयाने पुढे गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली होती. सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यावेळी केंद्र सरकारमधील काही मंत्र्यांनी काँग्रेस नेत्यांना ‘राष्ट्रविरोधी’ म्हटले होते. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी हे ट्विट केले.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी काळ्या पैशावर अंकुश लावण्यासाठी ५०० आणि १ हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर संपूर्ण देशात सर्वसामान्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जुन्या नोटा जमा करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. लोकांकडे पैशांची कमतरता असल्यामुळे व बँकेकडेही चलन तुटवडा असल्यामुळे देशात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकार व पंतप्रधान मोदींविरोधात आक्रमक धोरण स्वीकारले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशानातही विरोधकांकडून गोंधळ सुरू आहे.
Will the Govt call the Supreme Court anti national now?https://t.co/CaO8FwwUcD
आणखी वाचा— Office of RG (@OfficeOfRG) November 19, 2016