गोलाघाट (आसाम) : “काँग्रेसची विचारधारा म्हणजे द्वेषाविरोधात प्रेमाचा मार्ग आहे,” असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी आसाममधील निवडणूक प्रचारसभेत बोलताना केला. यावेळी त्यांनी लोकप्रिय आसामी गायक झुबिन गर्ग यांचे उदाहरण दिले. झुबिन गर्ग यांनी संपूर्ण आयुष्य आसाममधील लोकांना एकत्र आणण्यासाठी घालवले, असे राहुल म्हणाले.
“भाजप सरकार लोकांमध्ये द्वेष पसरवत आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा हे देशातील सर्वाधिक भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली. काँग्रेस सत्तेत आल्यास सरमा यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि त्यांना १०-१५ वर्षांसाठी तुरुंगात जावे लागू शकते, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांसह सरमा यांनी जमीन एटीएम प्रणाली तयार केली आहे. सामान्यांकडून जमीन काढून काही उद्योगपतींना दिली जात आहे. आसाममध्ये ९१ हजार ४०० हेक्टर जमीन भाजपचे आर्थिक पाठीराखे असलेल्या मोठ्या उद्योगसमूहांना देण्यात आली आहे. – राहुल गांधी, नेते, काँग्रेस
