Rahul Gandhi Assam Rally Himanta Biswa Sarma: काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. आसामच्या विश्वनाथ येथे आयोजित एका निवडणूक सभेला संबोधित करताना त्यांनी सरमा यांचा उल्लेख भारतातील ‘सर्वात भ्रष्ट आणि द्वेष पसरवणारे मुख्यमंत्री’ असा केला. काँग्रेस पक्षाचे ‘बब्बर शेर’ आगामी काळात सरमा यांना तुरुंगात टाकतील, असा थेट इशाराही त्यांनी यावेळी दिला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या कुटुंबालाही भ्रष्टाचारात ओढून मोठी चूक केली असून, आता त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर कायदेशीर आरोप होतील आणि त्यांनी माफी मागितली तरी ही कारवाई सुरूच राहील, असे गांधी यांनी ठामपणे सांगितले.
“चहा मळ्यातील कामगारांचे वेतन वाढवणार”
या सभेमध्ये राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या आगामी योजनांचा आणि निवडणूक जाहीरनाम्यातील प्रमुख आश्वासनांचा पुनरुच्चार केला. काँग्रेसचे सरकार आल्यास आसाममधील सहा समुदायांना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा (SC/ST) दर्जा दिला जाईल, असे महत्त्वाचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच चहा मळ्यातील कामगारांचे वेतन वाढवून ते दररोज ४५० रुपये केले जाईल, असेही ते म्हणाले. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर देताना गांधी यांनी सांगितले की, प्रत्येक महिलेला कोणत्याही अटीशिवाय तिच्या बँक खात्यात मासिक रोख रक्कम दिली जाईल आणि नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांना ५०,००० रुपयांचे अर्थसहाय्य पुरवले जाईल.
“झुबीन गर्ग प्रकरणातील सर्व आरोपींना शिक्षा देणार”
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर भाष्य करताना राहुल गांधी यांनी प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग यांचा उल्लेख केला. सत्तेवर आल्यानंतर १०० दिवसांच्या आत झुबीन गर्ग प्रकरणातील सर्व आरोपींना शिक्षा देऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. झुबीन गर्ग यांनी आयुष्यभर आसामला एकत्र ठेवण्याचे काम केले असून काँग्रेसची विचारधारा देखील द्वेषाविरुद्ध प्रेम पसरवण्याची आणि एकतेची आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
आसामचा कारभार दिल्लीतून!
केंद्रीय नेतृत्वावर टीका करताना राहुल गांधी यांनी आरोप केला की, सध्या आसामचा कारभार स्थानिक पातळीवरून नाही तर नवी दिल्लीतून नियंत्रित केला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प नरेंद्र मोदींना नियंत्रित करतात आणि नरेंद्र मोदी व अमित शाह आसामच्या मुख्यमंत्र्यांना नियंत्रित करतात, अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला. आसाममध्ये ९ एप्रिल रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार असून ४ मे रोजी निकालाची घोषणा केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ‘आसाममध्ये सरकार स्थापन होताच तातडीने सहा मोठे निर्णय लागू करू’ असे आश्वासन देत मतदारांना साद घातली आहे.
