सकाळी दिल्लीत पत्रकार परिषद घेत लखीमपूर खेरी इथे काहीही करुन जाण्याचा निर्धार राहुल गांधी यांनी व्यक्त केला होता. काँग्रेसतर्फे एक रितसर पत्र हे उत्तर प्रदेश सरकारला लिहिण्यात आलं होतं. तेव्हा आता काय होणार याची उत्सुकता लागुन राहिली असतांना अखेर उत्तर प्रदेश सरकारने प्रियंका गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसच्या इतर तीन नेत्यांना लखीमपूर खेरी भागात जाण्याची परवानगी दिली. त्यानुसार राहुल गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल हे लखनौ विमानतळावर पोहोचले. मात्र इथेच पुढच्या नाट्याला सुरुवात झाली आहे. 

तिन्ही नेत्यांनी पोलिसांच्याच गाडीने लखीमपूर खेरी इथे चलावे असा आग्रह या दौऱ्याची सुरक्षा व्यवस्था करणाऱ्या पोलिसांनी धरला आहे. एवढंच नाही तर राहुल गांधी आणि त्यांच्या सोबत असलेल्या नेत्यांभोवती पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. यामुळे संतापलेल्या राहुल गांधी यांनी लखनौ विमानतळावरच बसकण मारली असून पोलिसांच्या गाडीने जाण्यास नकार दिला आहे.

“वाहतुकीची व्यवस्था करणारे तुम्ही कोण ? मी माझ्याच गाडीने जाणार”, असं राहुल गांधी यांनी पोलिसांना सांगितलं आहे. तर हा एक खोडसाळपणा सुरु असल्याची प्रतिक्रिया तिथे उपस्थित असलेल्या प्रसारमाध्यमांना राहुल गांधी यांनी दिली आहे. “मला विमाानतळाच्या बाहेर जावू दिले जात नाहीये. ही कोणत्या प्रकारची परवानगी आहे ? माझी इथेच १०-२० दिवस थांबण्याची तयारी आहे” अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे. 

तेव्हा लखीमपूर खेरी इथे कांग्रेस नेते प्रत्यक्ष पोहचेपर्यंत पुढील काही तासांत आणखी मोठं राजकारण होतांना बघायला मिळणार यात शंका नाही.