इथेनॉल-मिश्रित पेट्रोलकडे भारताचा कल हळूहळू वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे इथेनॉलच्या उत्पादन क्षमतेत देखील वाढ होताना पाहायला मिळत आहे. मात्र, केंद्र सरकारच्या या ‘ई-२०’ पेट्रोल धोरणावरून म्हणजे इथेनॉल-मिश्रित पेट्रोलच्या धोरणावर देशभरातून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. काही दिवसांपूर्वी ई-२० पेट्रोल धोरणाच्या विरोधात आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत एक मोर्चा देखील काढला होता.

आता याच ‘ई-२०’ पेट्रोल धोरणाच्या विरोधात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील आक्रमक झाले आहेत. ई-२० पेट्रोल धोरणावरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘दाल में काला नहीं, पूरी दाल ही काली है’, असं म्हणत केंद्र सरकारच्या इथेनॉल-मिश्रित पेट्रोल धोरणावर राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला आहे. तसेच या ‘ई-२०’ पेट्रोल धोरणाच्या विरोधात आवाज उठवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

राहुल गांधी यांनी काय म्हटलं?

खासदार राहुल गांधी यांनी ई-२० पेट्रोल धोरणावर टीका करत एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. “दाल में काला नहीं, पूरी दाल ही काली है”, असं राहुल गांधी यांनी त्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. तसेच या व्हिडीओमध्ये राहुल गांधी हे एका कारचा पेट्रोल टँक उघडताना दिसत आहेत आणि ई-२० पेट्रोलच्या समस्यांबाबत बोलताना दिसत आहेत.

राहुल गांधी या व्हिडीओमध्ये पुढे म्हणत आहेत की, “ई-२० पेट्रोलचा मुद्दा हा लहान नाहीये, तर हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्ही लवकरच याविरोधात मोहीम सुरू करणार आहोत. ई-२० पेट्रोलच्या विरोधात आम्ही मोठ्या प्रमाणावर आवाज उठवणार आहोत. कारण त्यामुळे लोकांच्या गाड्यांचे, स्कूटरचे मोठे नुकसान होत आहे. खरं सांगायचं तर या माध्यमातून लोकांच्या खिशातील पैसे काढून घेतले जात आहेत”, अशा शब्दांत राहुल गांधींनी टीका केली आहे.

ई-२० पेट्रोलवरून ‘आप’ने काढला होता मोर्चा

माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानासमोर इथेनॉल-मिश्रित पेट्रोलच्या विरोधात मोर्चा काढला होता. या आंदोलनात आम आदमी पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते आणि पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून म्हटलं होतं की, “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊ नका आणि देशातील जनतेवर ई-२० पेट्रोल लादू नका. तसेच पेट्रोल पंपांवर ग्राहकांना ई-२० पेट्रोल आणि सामान्य पेट्रोल यापैकी कोणतं इंधन घ्यायचं? याचा पर्याय उपलब्ध करून द्या”, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली होती.