Rahul Gandhi on PM Narendra Modi: २०२६ च्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पश्चिम आशियातील संकटावरून विरोधी पक्ष आणि सरकारमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र हल्ला चढवत, या गंभीर जागतिक मुद्द्यावर चर्चा करण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला आहे.

“पंतप्रधान चर्चा टाळत आहेत”

राहुल गांधी म्हणाले, “पश्चिम आशियातील तणावामुळे भारतीय अर्थव्यवस्था, शेअर बाजार आणि इंधनाच्या किमतींवर मोठा परिणाम होऊ शकतो. पंतप्रधानांनी अमेरिकेसोबत केलेल्या करारांमुळे देशाचे मोठे नुकसान होऊ शकते”. या परिस्थितीला ‘ब्लॅकमेल’ आणि ‘तडजोड’ असे संबोधत राहुल गांधी म्हणाले की, या मुद्द्यावर संसदेत चर्चा झाली तर सत्य बाहेर येईल आणि म्हणूनच पंतप्रधान चर्चा टाळत आहेत.

राष्ट्रीय आणीबाणीसारखी परिस्थिती

राहुल गांधी यांनी इशारा दिला की पश्चिम आशियातील सुरू असलेला संघर्ष हा केवळ युद्ध नसून एक मोठा जागतिक बदल आहे. या संघर्षाचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे त्यांनी सांगितले. अलीकडील शेअर बाजारातील घसरण याचेच उदाहरण असल्याचेही ते म्हणाले. या मुद्द्यावर लवकरच चर्चा होऊन ठोस रणनीती आखली नाही तर भारताला गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. ही परिस्थिती राष्ट्रीय आणीबाणीसारखी आहे आणि यावर सभागृहात तातडीने चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी मागणी केली.

विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सभागृहातील अनुपस्थितीवर प्रश्न उपस्थित केले. “पंतप्रधान सभागृहात येणार नाहीत, मी तुम्हाला सांगतो,” असे आव्हानात्मक वक्तव्य करत त्यांनी टीका केली. कोणत्याही महत्त्वाच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आली की पंतप्रधान पुढे येण्याऐवजी मागे हटतात, असा आरोप त्यांनी केला. सरकार विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सर्व शक्य उपाय वापरत असल्याचाही त्यांनी आरोप केला.

पंतप्रधानांना ब्लॅकमेल केले जातेय!

दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेसोबत झालेल्या करारांवरही विरोधी पक्षनेत्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. राहुल गांधी यांनी आरोप केला की पंतप्रधान मोदींनी काही असे करार केले आहेत जे भारताच्या हिताविरुद्ध आहेत आणि भविष्यात देशाला मोठा धक्का देऊ शकतात. सरकार चर्चा टाळत आहे कारण त्या चर्चेतून पंतप्रधानांची कमकुवत भूमिका आणि त्यांना ब्लॅकमेल केले जात असल्याची परिस्थिती उघड होईल, असा दावाही त्यांनी केला.