पीटीआय, राणीपेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नियंत्रण आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केली. ट्रम्प यांना मोदींच्या आर्थिक व्यवहार, उद्योजक अदानींबरोबरचे संबंध ठाऊक आहेत, असा दावाही राहुल यांनी केला. तमिळनाडूच्या राणीपेट येथे प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांनी लक्ष्य केले.

घटनादुरुस्ती विधेयकावर चर्चेदरम्यान संसदेमध्ये पंतप्रधान निस्तेज दिसत होते, कारण ट्रम्प त्यांना नियंत्रित करत आहेत, असा दावा राहुल यांनी केला. ते म्हणाले, “जर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, मोदी उडी मारा, तर मोदी उडी मारतात. जर ते म्हणाले की, आडवे व्हा तर मोदी आडवे होतात. ट्रम्प त्यांच्यावर कसे नियंत्रण ठेवतात? ते एप्स्टीन फाइलच्या माध्यमातून मोदींना नियंत्रित करतात. कारण त्यांना मोदींच्या आर्थिक व्यवस्था माहीत आहेत आणि मोदींचे अदानींशी असलेले संबंध त्यांना समजतात.”

राहुल यांनी दावा केला की, जसे ट्रम्प मोदींना नियंत्रित करतात, त्याच प्रकारे मोदींना अण्णाद्रमुकच्या माध्यमातून तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांवर नियंत्रण ठेवायचे आहे. आपण द्रमुक किंवा मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही हे मोदींना माहीत आहे. त्यासाठीच राज्यात अण्णाद्रमुकची सत्ता यावी, अशी पंतप्रधानांची इच्छा आहे, असे राहुल म्हणाले.

ते (पंतप्रधान) विरोधकांचा सामना करू शकले नाहीत. ते बाजूला बसले होते. त्याचे कारण आहे, त्यांच्यावर अमेरिकेचे नियंत्रण आहे. त्यांनी आपल्या देशाला विकणारा भारत-अमेरिका व्यापार करार केला आहे. – राहुल गांधी, नेते, काँग्रेस