नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना माघारी आणण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारकडे कोणतीही योजना नाही, त्याचप्रमाणे देशातील बेरोजगारी, चीनची आगळीक, वाढती महागाई, रुपयाचे अवमूल्यन यावरही सरकारकडे उपाय नाही. हे सरकार केवळ प्रसिद्धी तंत्राचा वापर करण्यात मश्गूल आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी केली.
मोदी सरकार म्हणजे केवळ प्रसिद्धी, असा आरोप राहुल यांनी ट्विटरवर केला आहे. काँग्रेसच्या नेत्या शमा मोहम्मद यांनीही सरकारवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, सध्या देशात सर्वाधिक बेरोजगारी आहे, रुपया नीचांकी पातळीवर आहे (१ अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७६ रुपये ९६ पैसे). जेव्हा संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सत्तेत होती, तेव्हा रुपया आयसीयूत असल्याची टीका मोदी करीत असत. आता रुपया व्हेंटिलेटरवर असून प्राणवायूसाठी तडफडत असताना मोदी कुठे आहेत, असा सवाल त्यांनी केला. परदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरपासून भारतातून दोन लाख कोटींची गुंतवणूक काढून घेतली आहे, असा दावाही त्यांनी केला. गुंतवणूकदार मागील दाराने निघून जात आहेत आणि पंतप्रधान मोदी हे निवडणुकांत गुंतले आहेत, असा आरोप त्यांनी केला. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन चर्चा करतील काय, असा प्रश्न त्यांनी विचारला.