नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगातील मतभेदांच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला. ज्ञानेश कुमार हे देशद्रोही असून त्यांच्यासह मोदी आणि शहा यांच्यामुळे जनतेचा देशातील निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडू लागला आहे, अशी टीका गांधी यांनी केली. दुसरीकडे, कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) ज्ञानेश कुमार यांनी ४८ तासांत राजीनामा न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला तर, मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग आणण्याच्या हालचाली विरोधी पक्षांनी सुरू केल्या आहेत.

काँग्रेसच्या इंदिरा भवन या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशातील निवडणूक प्रक्रिया ‘मॅचफिक्स्ड’ झाली असून ज्ञानेश कुमार यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. मोदी व शहा हे गुन्हेगार असून त्यांची निवडणूक प्रक्रियेतील घोटाळ्यामध्ये चौकशी झाली पाहिजे. केंद्रात सत्तांतर होईल तेव्हा या दोघांचीही कसून चौकशी केली जाईल. त्यावेळी ज्ञानेश कुमार यांनी माफीचे साक्षीदार झाले पाहिजे, अशा शब्दांत राहुल गांधींनी तिघांना लक्ष्य केले.

देशातील निवडणुका फेरफार करून भाजपने जिंकल्या आहेत. त्यासाठी मतचोरी केली गेली. मतदानाचा अधिकारच नष्ट झाला तर त्यातून निर्माण झालेले संविधान, कायदे आणि घटनात्मक संस्थांची वैधताच शिल्लक राहणार नाही, असे खडेबोल राहुल गांधी यांनी सुनावले. उद्या भाजपने मोठा विजय मिळवला तरी त्या निकालावर लोकांचा विश्वास राहणार नाही. निवडणूक आयोगाने मतांचे संरक्षण केले नाही तर संविधानालाच अर्थ उरणार नाही, असा दावा त्यांनी केला.

ज्ञानेश कुमार हे ‘देशद्रोही’ असल्याची टीका राहुल गांधींनी केली. मतदाराच्या अधिकारावर आणि लोकशाही संस्थेवर हल्ला करणार्‍या व्यक्तीसाठी त्यापेक्षा वेगळा शब्द वापरता येणार नाही, असे ते म्हणाले.

मतचोरीच नाही, तर कायदाचोरी

व्यक्तीचे मत हाच देशाचा पाया आहे. पण, आता आमचे मत नष्ट झाले आहे. मतातून संविधानाला अधिकार मिळतो, संविधानातून कायदे बनतात आणि कायद्यांमधून संस्थांची निर्मिती होते. मतच चोरीला गेले असेल, तर त्या मतातून निवडून आलेले सत्ताधारी आणि संसदेकडून करण्यात आलेले कायदे आणि संस्थात्मक बदल विश्वासार्ह कसे असतील, असा घणाघाती प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केला. मत चोरीतून कायदा चोरीकडे आपण गेलो आहोत, असा आरोप गांधींनी केला. निवडणूक आयोग हा मताचे संरक्षण करणारा घटनात्मक संस्थात्मक ढाचा आहे; मात्र, आयोगाने ही जबाबदारी पार पाडण्यात पूर्णपणे अपयशी झाला आहे. देशातील लोकसभा व विधानसभा निवडणुका ‘रिग्ड’ म्हणजेच फेरफार करून जिंकल्या गेल्या असल्याचा आरोप गांधी यांनी केला. २०२४ च्या लोकसभा, तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याचे सिद्ध करणारी ‘पुरेशी माहिती’ असल्याचा आणि याबाबत ‘१०० टक्के खात्री’ असल्याचा दावा त्यांनी केला.

सरकारविरोधी जनमत गेले कुठे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या काही भाषणांचा संदर्भ देत, सत्ताधारी भाजपला सातत्याने निवडणुकांमध्ये यश कसे मिळते, असा प्रश्न उपस्थित केला. काँग्रेस आणि विविध प्रादेशिक पक्षांना सत्ताविरोधी लाटेचा (ॲण्टी इन्कम्बन्सी) सामना करावा लागला; मात्र मोदी आणि भाजपच्या बाबतीत सत्ताविरोधी लाट का दिसत नाही, असा सवाल राहुल गांधींनी केला. हरियाणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील निवडणुकांचा संदर्भ देत, त्यांनी पारंपरिक राजकीय सत्तांतराच्या पद्धतीकडे लक्ष वेधले. सत्ताविरोधी लाट कुठे गेली, असा प्रश्न उपस्थित करत, त्याचे उत्तर निवडणूक प्रक्रियेतील कथित घोटाळ्यांमध्ये असल्याचा दावा राहुल गांधींनी केला.

‘निवडणूक प्रक्रियेत मूलभूत बिघाड गेल्या तीन वर्षांपासून आपण निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेचा मुद्दा उपस्थित करत असून, आपले आरोप तथ्यांवर आधारित असल्याचा दावा त्यांनी केला. २०२३ च्या कायद्यानुसार पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेता यांचा समावेश असलेल्या समितीने निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली. त्यावेळी राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांच्या निवडीला विरोध केला होता. निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासार्हता कमी होणे, निवडणुकांमध्ये फेरफार होणे वगैरे गैरप्रकार यापूर्वी कधी झाले नव्हते, यासंदर्भात देश अशा ठिकाणी पोहोचला आहे, जिथे यापूर्वी कधीही पोहोचलेला नव्हता. देशातील निवडणुकांची प्रक्रिया मूलभूत स्तरावरच बिघडलेली असल्याचा दावा गांधी यांनी केला.