पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा गद्दार असा उल्लेख करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली. मोदी, शहा व संघ हे दररोज राज्यघटनेवर हल्ला करतात आणि त्यांनी देशाचे हित निवडक उद्योगपतींना विकले आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

रायबरेली येथे स्थानिक क्रांतिकारक वीरा पासी यांच्या स्मरणार्थ आयोजित ‘बहुजन स्वाभिमान सभे’ला संबोधित करताना गांधी यांनी हे टीकास्त्र सोडले. ‘‘संघाचे स्वयंसेवक तुमच्या घरी येऊन नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबद्दल बोलतील, तेव्हा त्यांना ठामपणे सांगावे लागेल. तुमची संघटना, मोदी व शहा हे द्रेशद्रोही आहेत.

त्यांनी आपला देश विकण्याचे काम केले आणि आपल्या राज्यघटनेवर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यावर हल्ला केला आहे,’’ असे राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधानांनी मनरेगा कमकुवत करून, जातनिहाय जनगणन न करता, निवडक उद्योगपतींना अनुकूलता दर्शवून रोजच राज्यघटनेवर हल्ला केला आहे, असा आरोप गांधी यांनी केला.

आपल्या दिशेने ‘आर्थिक वादळ’ येत असल्याचा इशारा देऊन विरोधी पक्षनेत्यांनी इंधनाचा वापर, सोने खरेदी, परदेश प्रवास कमी करणे यांबाबत मोदींनी केलेल्या आवाहनांचाही उल्लेख केला. ‘‘येत्या काही महिन्यांत महागाई झपाट्याने वाढेल. पेट्रोल, डिझेल, गॅस, अन्नधान्य, सर्व गोष्टींच्या किमती वाढतील,’’ असे ते म्हणाले.

‘अराजकतेची मानसिकता’ पंतप्रधानांचा उल्लेख देशद्रोही केल्याने भाजपने राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले. राहुल गांधी यांच्या शब्दांमधून त्यांची अराजक मानसिकता आणि चारित्र्य दिसून येते, अशी टीका भाजपने केली. गांधी यांचे वक्तव्य देशातील १४० कोटी जनतेचा अपमान करणारे असून, त्यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी केली.