देशात महागाईचा भडका उडालेला असतानाच आज सोमवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. यावरून लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. “निवडणुकीत मोठी आश्वासने द्यायची आणि नंतर जनतेच्या खिशावर दरोडा टाकायचा, एवढेच काम पंतप्रधान करत आहेत,” अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख ‘महागाई मानव’ (Mehangai Maanav)असा करत, भाजप सरकार निवडणुका संपताच पद्धतशीरपणे जनतेची लूट करत असल्याचा आरोप केला आहे.
हप्त्या-हप्त्याने खिसा कापला जातोय: राहुल गांधी
सोमवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात ₹२.६१ प्रति लीटर आणि डिझेलच्या दरात ₹२.७१ प्रति लीटर वाढ केली. गेल्या दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत झालेली ही चौथी दरवाढ आहे. या दरवाढीनंतर राहुल गांधी यांनी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत सरकारला धारेवर धरले. त्यांनी लिहिले की, “‘महागाई मानव मोदीं’चा पुन्हा एकदा जनतेवर वार झाला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे हप्त्या-हप्त्याने वाढवले जात आहेत, जेणेकरून जनतेला समजू न देता त्यांचा खिसा कापला जाईल. देशात आर्थिक संकट घोंघावत असल्याचा इशारा मी गेल्या अनेक महिन्यांपासून देत आहे.”
राहुल गांधी पुढे म्हणाले, “काही दिवसांपूर्वी पंतप्रधान निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र होते. मात्र, निवडणुका संपताच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एकूण तब्बल ८ रुपयांची वाढ झाली आहे. ही दरवाढ अशीच सुरू राहणार आहे. निवडणुकीत खोटी आश्वासने द्यायची आणि उर्वरित काळात सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला मारायचा, हेच ‘महागाई मानव’ मोदींचे काम आहे.”
दोन आठवड्यांत चौथी दरवाढ
पश्चिम आशियातील वाढता संघर्ष आणि जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्यामुळे सरकारी तेल कंपन्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. याच कारणामुळे देशात इंधन दरवाढ होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, विरोधकांनी हा आंतरराष्ट्रीय विषय नसून केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका असल्याचा आरोप केला आहे.
गेल्या काही दिवसांतील इंधन दरवाढीचा आलेख
- सोमवार (आज): पेट्रोल ₹२.६१ आणि डिझेल ₹२.७१ ने महागले.
- शनिवार: प्रति लीटर ९१ पैशांची वाढ.
- १९ मे: प्रति लीटर ९० पैशांची वाढ.
- १५ मे: थेट ३ रुपयांची मोठी दरवाढ. निवडणुका संपल्या आणि दरवाढ सुरू!
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये एप्रिल अखेरीस विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांचे निकाल ४ मे रोजी जाहीर झाले. विशेष म्हणजे, निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत म्हणजेच १२ मे पर्यंत देशातील इंधनाचे दर स्थिर होते. मात्र, निवडणुका संपताच अवघ्या काही दिवसांतच जनतेला महागाईचे मोठे झटके बसू लागले आहेत.
राहुल गांधी यांनी १२ मे रोजीच सरकारला इशारा दिला होता की, “केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका जनतेला सहन करावा लागणार आहे. निवडणुकीनंतरचा पहिला ३ रुपयांचा झटका बसला आहे, आता उर्वरित वसुली सरकार हप्त्या-हप्त्याने करणार आहे.” अखेर राहुल गांधी यांनी वर्तवलेला तो अंदाज आता खरा ठरताना दिसत असून सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.
