बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनला एका जाहिरातीवरुन ट्रोल केलं जातं आहे. यावरुन भाजपा खासदार आणि अभिनेत्री कंगनानेही तिच्याविरोधात पोस्ट केली होती. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी क्रितीला पाठिंबा दिला आहे. राहुल गांधींनी क्रितीची इन्स्टा स्टोरी पोस्ट करत त्यावर रिप्लाय दिला आहे. रक्षाबंधनच्या या जाहिरातीत क्रिती सेनॉनने परिधान केलेल्या पोशाखामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला. असे कपडे का घातले गेले आहेत? असा प्रश्न नेटकरी विचारू लागले. ज्यानंतर आता राहुल गांधींची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

अभिनेत्री क्रिती सेनॉन नुकतीच एका ज्वेलरी ब्रँडच्या रक्षाबंधनच्या जाहिरातीत दिसली होती. या जाहिरातीत सण साजरा करताना तिने ऑफ-व्हाइट रंगाचा ब्रालेट-स्टाईल ब्लाउज, त्यावर केप आणि ड्रेप्ड स्कर्ट परिधान केला होता. तिचा हा पोशाख रक्षाबंधन साठी शोभत नाही असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. एवढंच नाही तू असे कपडे घालून संस्कृती बिघडवते आहेस वगैरे टीकाही केली. पण क्रिती शांत होती. अभिनेत्री आणि खासदार कंगनाने मात्र क्रितीला जे खडे बोल ऐकवले त्यानंतर तिने सडेतोड उत्तर दिलं.

राहुल गांधींनी काय पोस्ट केली?

महिलांनी काय परिधान करायचं, काय करायचं, कुठे जायचं हा त्यांचा निर्णय असला पाहिजे. महिलांना त्यांच्या स्वातंत्र्यासाठी ट्रोल करणं थांबवा अशी प्रतिक्रिया देत त्यांनी क्रिती सेनॉनची स्टोरी पोस्ट केली आहे.

कंगनाने काय म्हटलं होतं?

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये क्रिती सेनॉनचे थेट नाव घेतले नसलं, तरी तिने क्रितीवर या ज्वेलरी ब्रँडच्या जाहिरातीवरून सुरू असलेल्या वादावरच भाष्य केलं. कंगना पोस्टमध्ये म्हणते, “महिलांसाठी हा खूप चांगला काळ आहे, आपल्या कपाटात वेगवेगळ्या कपड्यांचे अनेक पर्याय आहेत. आजची महिला ही जागतिक महिला आहे. कॉकटेल ड्रेसेसपासून ते लहेंगा चोली, जीन्स ते साडी आणि बिकिनीपासून ते सलवार कमीजपर्यंतचे अनेक पर्याय आज उपलब्ध असताना, तुम्ही तुमच्या भावाला बिकिनी किंवा अंतर्वस्त्रांमध्ये राखी का बांधाल? तुमचे इतर स्टायलिंगचे पर्याय कुठे गेले?” असा प्रश्न कंगनाने केला. ज्यावर क्रितीने सडेतोड उत्तर दिलं.

क्रितीची पोस्ट काय?

क्रिती सेनॉन म्हणाली, कुठल्याही सणांचं सौंदर्य हे कपड्यांमध्ये नसतं. त्याबाबतच्या भावनांमध्ये ते सौंदर्य असतं. या भावनाच आपल्याला आपल्या परंपराशी जोडून ठेवतात. आपण महिलांना हे सांगणं कधी बंद करणार आहोत की त्यांनी काय कपडे घातले पाहिजेत? एथनिक फॅशनमध्ये वेळेनुसार बराच बदल झाला आहे. मात्र आजही एखाद्या महिलेचं मूल्यमापन, ती संस्कृती टिकवते आहे की नाही हे सगळं तिच्या कपड्यांवरुनच जोखलं जातं. संस्कृती आणि परंपरा ही स्त्रियांच्या मनात असते. त्यांच्या कपड्यांमध्ये किंवा कपड्यांच्या नेकलाईनमध्ये नसते असं म्हणत क्रितीने कंगनाला उत्तर दिलं. यानंतर क्रितीच्या बहिणीनेही कंगना रणौतला उत्तर दिलं. आता राहुल गांधींनीही क्रिती सेनॉनला पाठिंबा दिला आहे.