माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या अंत्यसंस्काराच्या क्षणांना आठवत काँग्रेस नेते राहुल गांधी भावूक झाल्याचे आज एका व्हिडिओमधून दिसून आले. हा व्हिडिओ काँग्रेसने ट्विटरद्वारे शेअर केला आहे. इंदिरा गांधी यांचा मृत्यू होण्या अगोदर काही तासांपूर्वीच त्या राहुल गांधींनी नेमकं काय म्हणाल्या होत्या, हे देखील या व्हिडिओमध्ये राहुल गांधी यांनी सांगितलं आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची १९८४ मध्ये आजच्याच दिवशी त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी हत्या केली होती.

राहुल गांधींनी म्हणतात, “आजीने मृत्यूपूर्वी काही तास अगोदर सकाळी मला सांगितलं होतं, की जर त्यांना काही झालं तर रडू नकोस. तेव्हा मी त्यांच्या म्हणण्याचा नेमका अर्थ समजू शकलो नाही आणि त्यानंतर दोन-तीन तासांमध्येच त्यांचा मृत्यू झाला. माझ्या आयुष्यातील तो सर्वात कठीण दिवस होता.”

“ इंदिरा गांधींना त्यांची हत्या होऊ शकते हे माहीत होतं, पण तरीही… ” ; प्रियंका गांधींचं मोठं विधान!

“With love, in memory of my beloved Grandmother, Indira Ji” या शीर्षकाखाली यूट्यूबवरील व्हिडिओमध्ये राहुल गांधी यांनी इंदिरा गांधी यांच्याबद्दल सांगितलं की, “ त्यांना एकप्रकारे आभास होता की त्यांची हत्या केली जाईल आणि मला वाटतं घरी सर्वांनाच हे माहीत होतं. एकदा त्यांनी आम्हाला जेवणाच्या टेबलवर म्हटलं होतं की सर्वात मोठा शाप हा एखाद्या आजाराने मरणे असतो. त्यांच्या दृष्टीने कदाचित हा देशासाठी मरण्याचा सर्वोत्तम मार्ग होता. माझ्या दोन आई राहिल्या आहेत, एक सुपर आई जी माझी आजी होती, जी माझे वडील रागवल्यावर मला वाचवत होती आणि दुसरी माझी आई. तसेच, राहुल गांधींनी म्हटलं की त्यांच्यासाठी हे आई जाण्यासारखं होतं.”

या व्हिडिओत इंदिरा गांधी यांच्या अंत्यसंस्काराची दृश्य देखील आहेत, ज्यामध्ये लहान वयातील राहुल गांधी दिसतात. या अगोदर आज राहुल गांधी यांनी सकाळी इंदिरा गांधी यांचे स्मारक शक्ती स्थळ येथे जाऊ पुष्पहार अर्पण केला. त्यांनी ट्विट केलं की, “माझी आजी शेवटच्या श्वासापर्यंत निर्भिडपणे देशसेवेत होती. तिचे जीवन आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे. नारी शक्तीचे उत्कृष्ट उदाहरण श्रीमती इंदिरा गांधीजी यांच्या बलिदान दिवसावर विनम्र श्रद्धांजली.”