Rahul Gandhi Booked Haldwani FIR controversy : उत्तराखंड येथील हलद्वानी येथील ‘शुद्धीकरण हवन’ संदर्भात एफआयआर (FIR) नोंदवण्याची मागणी केल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधातच गुन्हा दाखल झाला आहे. उत्तराखंडमधील हलद्वानी शहरात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि एससी-एसटी कायद्याच्या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं.

राहुल गांधींनी काय आरोप केले होते?

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या रॅलीनंतर काही दिवसांनी हलद्वानी येथील रामलीला मैदानात हे शुद्धीकरण हवन (purification ritual) आयोजित करण्यात आलं होतं. राहुल गांधी यांनी या कृत्याला गुन्हा संबोधत, हे कृत्य संपूर्ण भारतात दलितांना सामोरे जाव्या लागणाऱ्या अस्पृश्यतेचं उदाहरण आहे आणि यामुळे भाजपा-आरएसएसची मानसिकता उघड होते, असं म्हटलं होतं. हलद्वानी येथील या विधीसाठी जबाबदार असलेल्यांवर एसी-एसटी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात यावा, या आपल्या मागणीचा गांधी यांनी पुनरुच्चार केला होता.

राहुल गांधींविरोधात कोणी तक्रार केली?

हलद्वानीचे पोलीस अधीक्षक (शहर) मनोज कुमार कत्याल यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितलं की, राहुल गांधी यांच्याविरुद्धचा एफआयआर हलद्वानी येथील जवाहर नगर कॉलनीचे रहिवासी अमित कुमार यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला आहे. रविवारी दाखल केलेल्या आपल्या तक्रारीत २६ वर्षीय कुमार यांनी दावा केला की, ते वाल्मिकी समाजाचे सदस्य आहेत आणि त्यांनी इतर अनुसूचित जातीच्या सदस्यांसह ११ ऑगस्ट रोजी हलद्वानी येथील रामलीला मैदानात आयोजित स्वच्छता मोहीम आणि धार्मिक विधीमध्ये भाग घेतला होता. त्यांनी दावा केला की या कृत्याचा कोणत्याही व्यक्तीशी किंवा जातीशी संबंध नव्हता. “असं असूनही, राहुल गांधी यांनी २९ ऑगस्ट रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, कोणतीही शहानिशा न करता, याला अस्पृश्यता आणि अनुसूचित जातींविरुद्धचा गुन्हा म्हटलं आणि या विधीमध्ये सहभागी झालेल्यांवर एफआयआर नोंदवण्याची मागणी केली”, असं कुमार यांनी तक्रारीत नमूद केलं.

त्यांनी सांगितलं की, ते स्वतः वाल्मिकी समाजाचे असूनही, त्यांची प्रतिमा अस्पृश्यता पाळणारे आणि दलित विरोधी अशी तयार करण्यात आली आहे. गांधी यांच्या आरोपांमुळे विविध समाजांमध्ये शत्रुत्व आणि तणाव वाढल्याचा दावाही कुमार यांनी केला. त्यांच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी राहुल गांधी यांच्याविरुद्ध बीएनएस कलम १९६: धर्म, वंश या कारणांवरून विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि सलोखा राखण्यास बाधा आणणारे कृत्य करणे, कलम २९९: कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करून त्यांच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने केलेले जाणीवपूर्वक आणि दुर्भावनायुक्त कृत्य, SC/ST कायदा कलम ३ (१) (Q): सरकारी कर्मचाऱ्याला खोटी किंवा क्षुल्लक माहिती देणे, ज्यामुळे त्या सरकारी कर्मचाऱ्याने अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या सदस्याला इजा पोहोचवण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी आपल्या अधिकाराचा वापर करावा आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं होतं की, काँग्रेस हा मुद्दे नसलेला पक्ष आहे आणि ज्यांनी हवन केले ते भाजपाचे कार्यकर्ते नव्हते.