Rahul Gandhi BRICS Dinner Remark : BRICS शिखर परिषदेत सहभागी नेत्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या डिनरमध्ये पूर्णपणे शाकाहारी भोजन देण्यात आल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ८० टक्के भारतयी मांसाहारी आहेत, असं राहुल गांधी म्हणाले. मात्र, त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये ब्रिक्स परिषदेचा किंवा गाला डिनरमधील मेन्यूचा उल्लेख केलेला नाही. मात्र, त्यांनी ही पोस्ट गाला डिनरसाठीच केलं असल्याचं स्पष्ट होतंय.
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?
“नोंद करून ठेवा, ८० टक्के भारतीय मांसाहारी आहेत. भारतीय मांसाहारी पदार्थ स्वादिष्ट असतात. माझ्या बहिणीने बनवलेले छोले भटुरेही तितकेच स्वादिष्ट आहेत”, असं राहुल गांधी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी डायनिंग टेबलवरील छोले भटुरेचा फोटोही शेअर केला.
गाला डिनरमध्ये काय मेजवानी होती?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ब्रिक्स देशांच्या नेत्यांसाठी आणि प्रतिनिधींसाठी डिनरचं आयोजन केलं होतं. ब्रिक्स डिनरची सुरुवात ‘खंडवी मिल्ले’ या वाफवलेल्या बेसनाच्या रोलने आणि ‘खुंब गलौटी’ या पुदिन्याच्या मोत्यांसह दिल्या जाणाऱ्या मशरूम कबाबने झाली. मुख्य भोजनामध्ये पनीर लबाबदार, गुच्छी मार्मिक म्हणजे हिमालयीन मोरेल मशरूम आणि अॅस्पॅरेगस, तसेच गाजर-बीन पोरीयल यांचा समावेश होता. याशिवाय थक्काली बेले सारू हे हलके डाळीचे सूप, मिलेट पुलाव, बीटरूट रायता आणि विविध प्रकारच्या भारतीय भाकरी व रोट्याही देण्यात आल्या. मिष्टान्नामध्ये जुन्या दिल्लीतील फळांची क्रीम, जिलेबी आणि शहतूत फिरनीचा समावेश होता.
या डिनरच्या निमित्ताने १०० हून अधिक कलाकारांचा सहभाग असलेला विशेष सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. या कलाकारांमध्ये भारतासह इतर ब्रिक्स सदस्य देशांतील कलाकारांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता.
BRICS शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींचा इशारा
दरम्यान, BRICS शिखर परिषदेच्या समारोपाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदस्य देशांमध्ये अधिक लवचिकता आणि सहनशीलता निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. तसंच महत्त्वपूर्ण खनिजांच्या ‘शस्त्रीकरणामुळे’ सामूहिक विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.
‘लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता’ या विषयावरील BRICS सत्रात बोलताना मोदी म्हणाले, “तंत्रज्ञान आणि महत्त्वपूर्ण खनिजांचे शस्त्रीकरण आपल्या सामायिक प्रगतीला अडथळा ठरू शकते. त्यामुळे तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना सर्वसमावेशकतेवर आम्ही भर दिला आहे.”
