गेल्या काही दिवसांपासून देशभरात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलने सुरू आहेत. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) आणि निवडणुकीतील कथित गैरप्रकारांविरोधात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. इंडिया आघाडीच्यावतीने १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर महामोर्चा काढण्यात आला आहे.

इंडिया आघाडीच्या दिल्लीतील महामोर्चानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि इतर भाजपाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपामध्ये चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. या घडामोडी सुरू असतानाच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक पोस्ट शेअर करत मोदींना खुलं आव्हान दिलं आहे.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर गंभीर आरोप करत थेट खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे. ‘तुम्ही परकीय शक्तींच्या मदतीने पंतप्रधान झालात’, असं म्हणत तुमच्यात हिंमत असेल तर कोणत्याही व्यासपीठावर चर्चेला या’, असं खुलं आव्हान राहुल गांधी यांनी मोदींना दिलं आहे. या संदर्भात राहुल गांधी यांनी एक्सवर (ट्विटर) सविस्तर पोस्ट शेअर केली आहे.

राहुल गांधींनी काय म्हटलं?

“पंतप्रधान मोदीजी तुम्ही या देशाला खोटं बोलणं थांबवा. तुम्ही परकीय शक्तींच्या मदतीने पंतप्रधान झाला आहात आणि त्याच परकीय पाठिंब्यामुळे तुम्ही आजही पंतप्रधान पदावर आहात. तुमची आर्थिक व्यवस्था पूर्णपणे परकीय हितसंबंधांच्या नियंत्रणाखाली आहे आणि त्यांनाच तिचा पाठिंबा आहे. परकीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खंबीरपणे तुमच्या बाजूने उभे आहेत.”, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला आहे.

‘कोणतंही व्यासपीठ, कोणतीही वेळ, हिंमत असेल तर…’

“मी तुम्हाला या विषयावर खुल्या चर्चेचं आव्हान देतो. कोणतंही व्यासपीठ, कोणतीही वेळ, तुमच्यात हिंमत असेल तर नक्की या. पण तुम्ही येणार नाहीत, कारण माझ्याकडे तुमच्याबद्दल जी माहिती आहे, तिची तुम्हाला भीती वाटत असावी”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

‘मतदार यादीतील घुसखोरांना काँग्रेस संरक्षण देतंय’; अमित शाहांचा आरोप

इंडिया आघाडीच्या १ नोव्हेंबरच्या रॅलीनंतर आता भाजपाच्यावतीने आज (२ नोव्हेंबर) हैदराबादमध्ये ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ महारॅली काढण्यात आली. या महारॅलीच्या सभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्यासह सर्वच विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. अमित शाह म्हणाले की, “हैदराबादमध्ये आज हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ या महारॅलीसाठी हे लोक रस्त्यावर उतरले आहेत. काल दिल्लीत एक रॅली काढण्यात आली होती आणि ती रॅली राहुल गांधींनी आयोजित केली होती. राहुल गांधींनी दावा केला की त्यांची रॅली ‘व्होट बचाव’ रॅली होती. मात्र, त्यांची रॅली ही व्होट बचाव रॅली नव्हती, तर घुसखोरांना वाचवा अशी रॅली होती”, अशी टीका अमित शाह यांनी केली.

“एसआयआरला विरोध करून काँग्रेस पक्ष देशाच्या मतदार याद्यांमधील बांगलादेशी घुसखोरांना वाचवू इच्छित आहे. मी आज येथे हे सांगायला आलोय की, राहुलजी आणि रेवंत रेड्डीजी तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी भाजपा पक्ष हे सुनिश्चित करेल की प्रत्येक घुसखोराला मतदार यादीतून काढून टाकलं जाईल आणि त्यांना देशाबाहेर हाकलून दिलं जाईल. संपूर्ण काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष एसआयआरला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण हे घुसखोर त्यांची ‘व्होट बँक’ आहेत. मात्र, आम्ही एसआयआरच्या बाजूने ठामपणे उभे आहोत. केवळ या देशाचे नागरिकच येथे मतदान करू शकतील”, अशी टीका अमित शाह यांनी केली.