गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेस आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक पोस्ट शेअर करत पंतप्रधान मोदींना थेट खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे. या संदर्भात राहुल गांधींनी एक्सवर (ट्विटर) सविस्तर पोस्ट शेअर केली आहे.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर पुन्हा टीका करत खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे. ‘खरा देशद्रोही कोण आणि कोणाचे परकीय शक्तींशी संबंध आहेत हे स्पष्ट करण्यासाठी समोरासमोर या, हवं तर मोहन भागवतांना पंच म्हणून बोलवा’, असं आव्हान राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना दिलं आहे. तसेच अदानी आणि एपस्टीन व अमेरिकेबरोबरच्या करारांवरून त्यांनी थेट प्रश्न उपस्थित केले आहेत.
राहुल गांधींनी काय म्हटलं?
“पंतप्रधान मोदीजी, २४ तास उलटून गेले आहेत. मी तुम्हाला एक आव्हान दिलंय. तुम्ही आरोप करत आहात की विरोधक ‘देशद्रोही’ आहेत. मग कोणतंही ठिकाण, कोणतंही व्यासपीठ निश्चित करा आणि माझ्याशी समोरासमोर खुली चर्चा करा. खरा देशद्रोही कोण आहे? कोणाचे परकीय शक्तींशी संबंध आहेत आणि ते संबंध नेमकं कोणत्या स्वरूपाचे आहेत? यावर चर्चा करा. घाबरू नका. आपण मीडियाच्या उपस्थितीत आणि देशातील तरुणांसमोर चर्चा करू. एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बसा, तसेच पंच म्हणून तुम्ही कोणाचीही निवड करू शकता, हवं तर मोहन भागवतांनाही बोलवा. मग आपण चर्चा करूया”, असं आव्हान राहुल गांधींनी दिलं आहे.
“देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत आणि स्ट्रक्चरबाबत प्रश्न उपस्थित केले जातीलच. कारण अमेरिकेबरोबरचा करार कसा अस्तित्वात आला? तो का झाला? तो एवढ्या घाईघाईने का पूर्ण केला? तो हाताळण्याची जबाबदारी केवळ तुमच्याकडेच का होती? मंत्रिमंडळाला त्याबद्दल माहिती का दिली गेली नाही? अदाणी प्रकरण का बंद करण्यात आलं? एपस्टीनचं प्रकरण, अशा अनेक मुद्द्यांवर आपण खुली चर्चा करू”, असं आव्हान राहुल गांधींनी दिलं.
“मोदीजी, समोरासमोर या, घाबरू नका. आपण या प्रकरणाच्या मुळाशी जाऊ आणि सत्य समोर आणू. तुम्ही माझ्यावर आरोप केले, तर मग आता समोर या, म्हणजे सर्व काही स्पष्ट होईल. तुम्ही माझ्यावर इतर प्रकरणांमध्ये मानहानीचे दावे दाखल केलेत, कदाचित असे ४५ खटले असतील. पण या ‘परदेशी संबंधां’च्या मुद्द्यावर तुम्ही एकही दावा दाखल केला नाही. जरूर दावा दाखल करा. आपण त्यावरही खुली चर्चा करू. चला मग या सर्व गोष्टींवर चर्चा करू, दिवाळीच्या शुभेच्छा मोदीजी.”, असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी यांना चर्चेसाठी खुलं आव्हान दिलं.
“तुम्ही परकीय शक्तींच्या मदतीने पंतप्रधान झालात” ; राहुल गांधी
राहुल गांधींनी सोमवारीही एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये राहुल गांधी म्हणाले होते की, “पंतप्रधान मोदीजी तुम्ही या देशाला खोटं बोलणं थांबवा. तुम्ही परकीय शक्तींच्या मदतीने पंतप्रधान झाला आहात आणि त्याच परकीय पाठिंब्यामुळे तुम्ही आजही पंतप्रधान पदावर आहात. तुमची आर्थिक व्यवस्था पूर्णपणे परकीय हितसंबंधांच्या नियंत्रणाखाली आहे आणि त्यांनाच तिचा पाठिंबा आहे. परकीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खंबीरपणे तुमच्या बाजूने उभे आहेत. मी तुम्हाला या विषयावर खुल्या चर्चेचं आव्हान देतो. कोणतंही व्यासपीठ, कोणतीही वेळ, तुमच्यात हिंमत असेल तर नक्की या. पण तुम्ही येणार नाहीत, कारण माझ्याकडे तुमच्याबद्दल जी माहिती आहे, तिची तुम्हाला भीती वाटत असावी”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.
