माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून संसदेमध्ये सुरू झालेले आख्यान बुधवारीही कायम होते. या पुस्तकातील चिनी घुसखोरीच्या मुद्द्यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली. पंतप्रधान लोकसभेत आले, तर मी स्वतः त्यांच्याकडे जाऊन त्यांना हे पुस्तक देईन. जेणेकरून ते हे पुस्तक वाचू शकतील आणि देशाला खरी परिस्थिती कळेल, असा शाब्दिक हल्लाबोल केला.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत राहुल गांधी यांनी जनरल नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख केला होता. त्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये गेले दोन दिवस शाब्दिक चकमक झाली. लोकसभेत राहुल गांधींना त्यांचे भाषणही पूर्ण करून दिले गेले नाही. या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या काँग्रेस व ‘माकप’च्या एकूण ८ खासदारांना निलंबित केले. या प्रकरणावरून बुधवारी लोकसभेत विरोधकांनी गोंधळ घातला. त्यावरून लोकसभेचे कामकाज वारंवार तहकूब झाले. सकाळी ११ वाजता कामकाज सुरू होताच काही मिनिटांमध्ये विरोधकांच्या गदारोळात झाले. त्यानंतर दुपारी १२, त्यानंतर २ वाजता व त्यानंतर थेट संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सभागृह तहकूब झाले.

काँग्रेसच्या खासदारांची निदर्शने

संसदेच्या आवारात मकरद्वाराच्या पायऱ्यांवर काँग्रेसच्या खासदारांनी निदर्शने केली. त्या वेळी राहुल गांधी जनरल नरवणे यांचे ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या अप्रकाशित पुस्तकाची प्रत घेऊन आले होते. ही प्रत पत्रकारांना दाखवत, मला वाटत नाही पंतप्रधान आज लोकसभेत येतील, ते आले तर मी त्यांना हे पुस्तक देईन, असे म्हणत राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदींना लक्ष्य केले. केंद्र सरकार, लोकसभाध्यक्ष आणि संरक्षणमंत्रीदेखील हे पुस्तक अस्तित्वातच नाही, असा दावा करत आहेत. पण, हे पुस्तक अस्तित्वात आहे. केंद्र सरकार हे पुस्तक देशात प्रकाशित करू देत नाही पण, ते परदेशात प्रकाशित झाले आहे. देशातील प्रत्येक तरुणाने हे पुस्तक पाहिले पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले.

गंभीर आरोप

  • केंद्र सरकारने नाकारले तरी हे जनरल नरवणे यांचेच पुस्तक असून त्यामध्ये लडाखमधील चिनी घुसखोरीच्या घटनांची सविस्तर माहिती दिली असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. या पुस्तकातील मजकूर थेट उद्धृत करण्यास लोकसभेत मला मनाई केली गेली. मात्र, पुस्तकात पंतप्रधानांनी दिलेल्या संदेशाची ‘प्रमुख ओळ’ स्पष्टपणे नमूद केल्याचा दावा त्यांनी केला.
  • जनरल नरवणे यांनी चिनी घुसखोरीसंदर्भात काय करायचे, काय आदेश आहेत असे विचारले तेव्हा ‘जे योग्य वाटेल ते करा’, असे मोदी म्हणाले होते. हा मुद्दा पुस्तकामध्ये नमूद केला असल्याचे राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
  • राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार, कैलास रेंजवर चिनी रणगाडे भारतीय हद्दीत आल्यावर तत्कालीन लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना फोन केला. मात्र, सुरुवातीला त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
  • परराष्ट्रमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्याशी चर्चा झाली, पण स्पष्ट आदेश आले नाहीत. नंतर राजनाथ सिंह यांनी ‘वरून विचारतो’ असे सांगितल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.
  • आधीपासूनच लष्कराला ‘स्टँडिंग ऑर्डर’ होती की चिनी सैन्य आत शिरले तरी परवानगीशिवाय गोळीबार करायचा नाही. प्रत्यक्षात भारतीय सैन्य त्या रणगाड्यांवर कारवाई करू इच्छित होते. मात्र, पंतप्रधानांनी ठोस निर्णय न घेता जबाबदारी लष्करप्रमुखांवर सोपवली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
  • जनरल नरवणे यांनी आपल्या पुस्तकात स्पष्टपणे लिहिले आहे की, मला खूप एकटे वाटले. संपूर्ण व्यवस्थेने मला वाऱ्यावर सोडले होते… नरवणेंनी लिहिलेल्या याच सत्याला केंद्र सरकार घाबरत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

पीएम इज कॉम्रोमाइज्ड!

लोकसभेत काँग्रेसच्या सात खासदारांच्या निलंबनाविरोधात तसेच, भारत-अमेरिका व्यापार कराराविरोधात बुधवारी काँग्रेसच्या खासदारांनी नव्या संसदेच्या मकरद्वाराच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. ‘पीएम इज कॉम्रोमाइज्ड!’ असे लिहिलेला मोठा फलक घेऊन हे खासदार निदर्शने करत होते. त्यामध्ये राहुल गांधी व प्रियंका गांधी-वाड्राही सहभागी झाल्या होत्या.

ही निदर्शने सुरू असताना तिथे काँग्रेसचे माजी नेते व विद्यमान केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू आले. राहुल गांधींवर नाराज होऊन रवनीत सिंग यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली व ते भाजपमध्ये सहभागी झाले. त्यांना बघून राहुल गांधींनी, ‘हे बघा गद्दार इकडेच येत आहेत. त्यांचा चेहरा तरी बघा…’, असे म्हणत त्यांनी रवनीत यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला. पण, रवनीत यांनी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. त्यावर, ‘माझ्या गद्दार मित्रा, चिंता करू नको, तूही परत येशील…’, असा टोला राहुल गांधींनी रवनीत यांना हाणला. ‘देशाचे शत्रू…’ असा टोमणा मारत रवनीत संसदेच्या इमारतीत निघून गेले.