नवी दिल्ली : केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
‘‘मोदी सरकारमधील सुमारे २०० सरकारी अधिकारी आमच्या संपर्कात आहेत. मला सातत्याने संदेश मिळत आहेत,’’ असा दावा गांधी यांनी केला. संविधानाचे रक्षण आणि निवडणूक व्यवस्थेत सुधारणा होईपर्यंत तरुणांचा संघर्ष सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले. ‘‘हा संविधान वाचवण्याचा लढा आहे. रस्त्यावर जे लोक आंदोलन करीत आहेत, त्यांच्या पाठीशी देशातील नागरिकांनी उभे राहावे. तुम्हाला आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होता येत नसेल, तरी तुमचा आवाज बुलंद करा,’’ असे आवाहन त्यांनी केले.
‘‘दिल्लीला तुरुंगात का बदलण्यात आले आहे? लोकांना दिल्लीत येण्यापासून रोखले जात आहे. बस आणि रेल्वे अडविल्या जात आहेत. सर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि दिल्लीला किल्ल्याचे स्वरूप देण्यात आले आहे,’’ असा आरोप गांधी यांनी केला.
‘इंडिया’ आघाडीचे नेते सोमवारी सर्वोच्च न्यायालयाकडे जंगी मोर्चा काढला. त्यापूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सरकारवर टीका केली. दिल्लीतील आंदोलन चिरडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या काही दिवसांत हजारो आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
आम्ही तोच प्रश्न विचारत आहोत, जो दोन निवडणूक आयुक्तांनी उपस्थित केला आहे. मग ज्ञानेश कुमार राजीनामा का देत नाहीत? ज्ञानेश कुमार, तुमची झोप उडाली आहे. आम्ही तुम्हाला माफ करणार नाही. लाखो लोक तुमच्याकडे प्रश्न विचारत आहेत आणि हे प्रश्न थांबणार नाहीत. – राहुल गांधी, नेते, काँग्रेस
आम्ही सूत्रधारापर्यंत पोहोचूच…
राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांना सरकारविरोधात साक्ष देण्याचे पुन्हा आवाहन केले. ‘‘तुमच्याशी संपर्कात असलेल्यांपैकी कोणीतरी तुम्हाला वाचवू शकते. तुम्ही चूक केली असेल, तर कदाचित तुम्हाला माफीही मिळू शकते. मात्र, या सगळ्यामागील सूत्रधार तुम्ही नाही,’’ असे सांगत राहुल गांधींनी मोदी-शहांकडे आंगुलीनिर्देश केला. मोदी सरकार मोठी चूक करत असल्याचा आरोप करताना त्यांनी पोलिसांच्या तैनातीवरही प्रश्न उपस्थित केला. ‘‘सरकारला जितकी अधिक सुरक्षा द्यायची असेल तितकी द्या. त्यामुळे आम्हाला शेवटी ज्ञानेश कुमार यांच्या नियंत्रणातील व्यक्तीपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होईल,’’ असा दावा त्यांनी केला.
महिला आंदोलकांशी गैरवर्तन
दिल्लीतील आंदोलनादरम्यान महिला आंदोलकांशी पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोपही गांधी यांनी केला. महिला आंदोलकांना पोलिसांकडून मारहाण झाल्याचे दाखवणारे व्हिडीओ त्यांनी पत्रकारांना दाखविले. ‘‘तरुण मोदींच्या पोलिसांना घाबरले आहेत, असे चित्र निर्माण केले जात आहे. मात्र, देशातील तरुण घाबरणार नाहीत,’’ असे गांधी म्हणाले.
ही वेगवेगळी आंदोलने नाहीत!
इंडिया आघाडीचे आंदोलन आणि ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (सीजेपी) तसेच डाव्या विद्यार्थी संघटना आदींच्या आंदोलनांबाबत, राहुल गांधी यांनी, ही आंदोलने वेगवेगळी नसल्याचे स्पष्ट केले. ‘‘ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील सर्व आंदोलने हा एकच संघर्ष आहे. कोणता पक्ष किंवा संघटना आंदोलन करीत आहे, याने फरक पडत नाही. ही समांतर आंदोलने नाहीत,’’ असे त्यांनी सांगितले.
