Rahul Gandhi claim Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशभरातली युवकांनी रणशिंग फुंकलं आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी विविध राज्यातून मागणी करण्यात येत आहे. आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही यात सक्रीय सहभाग घेतला असून ते आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करायला जाणार आहेत. दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार त्यांच्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला.

मुख्य निवडणूक आयुक्तांनी तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का? असा प्रश्न राहुल गांधींना आज पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, “ज्ञानेश कुमारांचे मला मेसेज येतात. ते ही पत्रकार परिषदही पाहत आहेत.” राहुल गांधींच्या या दाव्यावर प्रतिप्रश्न विचारण्यात आला की, त्यांच्या मेसेजला काय उत्तर दिलं? त्यावर ते म्हणाले की, “माफीचा साक्षीदार व्हा. तुम्ही गुन्हा केला आहे आणि खरं सांगायचं तर, तुम्ही मुख्य गुन्हेगार नाही आहात. तुमच्याकडून चूक झाली आहे. तुम्ही चूक केली आहे. पण त्या चुकीमागे तुमचा हात नाही,” असे राहुल गांधी म्हणाले.

राजधानी दिल्ली तुरुंगात का?

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी १२ ऑक्टोबर रोजी नियोजित काँग्रेसच्या मोर्चापूर्वी एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. यादरम्यान ते म्हणाले, “लोकांना दिल्लीत पोहोचण्यापासून रोखले जात आहे. ट्रेन आणि बसेस थांबवल्या जात आहेत. दिल्लीला एका किल्ल्यात बदलण्यात आले आहे. भारताची राजधानी असलेली दिल्ली तुरुंगात का आहे?”

ते पुढे म्हणाले, “मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आपल्या पदाचा राजीनामा का देत नाहीत? विरोधी पक्षाच्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. हे का घडत आहे? कारण आम्ही तोच प्रश्न विचारत आहोत जो दोन निवडणूक आयुक्तांनी विचारला होता. आम्हाला माहीत आहे की ज्ञानेश कुमार यांना रात्री झोप लागलेली नाही. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून तुमची सुटका होणार नाही. हे लाखो लोक तुम्हाला प्रश्न विचारत आहेत आणि ते थांबणार नाहीत.”

‘मोदी सरकारमधील २०० लोक आमच्या संपर्कात आहेत’: राहुल गांधी

राहुल गांधी म्हणाले की, तुमच्या सरकारमधील दोनशे अधिकारी आमच्या संपर्कात आहेत. जोपर्यंत संविधानाचे रक्षण होत नाही आणि निवडणूक व्यवस्था सुधारत नाही, तोपर्यंत देशातील तरुण थांबणार नाहीत. आम्ही मागे हटणार नाही. संविधानाचे रक्षण करण्यासाठीची ही आमची लढाई आहे.

संविधान वाचवण्यासाठी राहुल गांधींचे एकजुटीचे आवाहन

राहुल गांधी यांनी सर्वसामान्य जनतेला आवाहन केले आणि सर्वोच्च न्यायालयाकडे जाणाऱ्या मोर्चात आंदोलकांसोबत एकजूट दाखवण्यास सांगितले. ते म्हणाले, “जर तुम्ही काही कारणास्तव येऊ शकत नसाल, तर आम्ही जेव्हा सर्वोच्च न्यायालयात असू, तेव्हा आम्हाला तुमची साथ दर्शवा. तुम्ही संविधानाच्या बाजूने उभे आहात हे दाखवून द्या. देशात जे काही घडत आहे त्याविरुद्ध तुम्ही आहात, हे तुम्ही व्यक्त केले पाहिजे आणि देशाला सांगितले पाहिजे.”

राहुल गांधी यांनी असाही आरोप केला की, महिला आंदोलकांना पोलिसांकडून मारहाण आणि छळ केला जात आहे, जेणेकरून पालकांनी त्यांच्या मुलांना आंदोलनात येण्यापासून रोखावे. भारताचे तरुण मोदींच्या पोलिसांना घाबरतात, अशी भीती तयार केली जात आहे.